मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - 20 Dec 2015
बृहन्मुंबई महानगरपालिका बृहन्मुंबई क्षेत्रात दोन ठिकाणी सॅनिटरी नॅपकीन / पॅड आणि लहान मुलांचे डायपर्स नष्ट करणारी भट्टी उपलब्ध करुन देणार असून याद्वारे सुमारे सहा टक्के स्थानिक कचरा कमी होणार आहे. तसेच महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. पल्लवी दराडे यांच्या पुढाकाराने महिलांच्या आरोग्य स्वच्छतेबाबत तसेच सार्वजनिक स्वच्छताविषयक कार्यशाळा घेण्यात येत आहेत. या कार्यशाळेचा लाभ आतापर्यंत सुमारे चारशे महिलांनी घेतला आहे. महापालिकेने सुरु केलेल्या या उपक्रमाबाबत महिलावर्गातून कौतुक करण्यात येत आहे.
'स्वच्छ मुंबई – स्वच्छ भारत अभियान' अंतर्गत बृहन्मुंबई परिसरात मोठय़ा प्रमाणात स्वच्छतेचे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. केंद्र व राज्य सरकार यांच्या मार्गदर्शनाने बृहन्मुंबई महानगरपालिकेने 'हागणदारीमुक्त बृहन्मुंबई' ही संकल्पना साकार करण्यासाठी कंबर कसली आहे. या अभियानांतर्गत लोकप्रतिनिधींसह पालिकेतील अधिकारी नियोजनबद्ध स्वच्छता अभियान राबवित आहेत. बृहन्मुंबई महापालिकेने यादरम्यान केलेल्या अभ्यासात प्रतिदिन तयार होणाऱया कचऱयापैकी सुमारे सहा टक्के स्थानिक कचरा हा लहान मुलांचे डायपर्स व महिलांना स्वच्छतेकरीता उपयोगी सॅनिटरी पॅड यास्वरुपाचा असल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक वेळा हे डायपर्स आणि सॅनिटरी पॅड खुल्या / सार्वजनिक जागांवर टाकल्याने अस्वच्छता पसरते तसेच सार्वजनिक शौचकुपांत व आसपास टाकल्याने सार्वजनिक शौचकुपे देखील तुंबतात. यामुळे अंदाजे २०% सार्वजनिक शौचकुपे बंद स्थितीत आढळतात.
या सर्व बाबींचा विचार करुन, बृहन्मुंबई महानगरपालिकेने चिंचनी मायाका महिला सहकारी संस्था यांच्या सहकार्याने मानखुर्द भागातील सोनापूर येथील पीएमजीडी कॉलनी येथे डायपर्स आणि सॅनिटरी पॅड एका ठिकाणी संकलित करुन त्याचे भट्टीमध्ये ज्वलन करण्यात येईल. या स्वरुपाचे कार्य ओम गगनगिरी महिला सहकारी संस्थेद्वारे टेंभिपाडा या भागात करण्यात येणार आहे. यासाठीची प्रशासकीय कार्यवाही सुरु आहे. महिलांच्या आरोग्य स्वच्छतेचा एक भाग म्हणून सॅनिटरी पॅड (पर्यावरण स्नेही) निर्माण करण्यासाठी महिलांना प्रशिक्षित अशा प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी राजस्थान येथील उदयपूर येथे या विषयावर कार्यरत असलेल्या 'जतन' या संस्थेद्वारे सुमारे ३५ साधन व्यक्तिंना ‘प्रशिक्षक’ बनण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
No comments:
Post a Comment