मुंबई / अजेयकुमार जाधव / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - 18 Dec 2015
मुंबई महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या ट्याब मध्ये घोटाळा झाला असून या घोटाळ्याची चौकशी करून कारवाई न झाल्यास दोन दिवसांनी या प्रकरणी न्यायालयात जाऊ असा इशारा राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिला आहे.
मुंबई महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना ट्याब वाटप करण्याची घोषणा पालिकेतील सत्ताधारी असलेल्या शिवसेनेने केली होती. या प्रमाणे प्रस्ताव पालिकेत आणण्यात आला. या प्रस्तावात अनेक त्रुटी असल्याने विरोधी पक्षांनी या प्रस्तावाला विरोध केला होता. या प्रस्तावानुसार दोन वर्षासाठी १६ कोटी ७६ लाख रुपये खर्चून टेक्नो इलेक्ट्रोनिक्स कंपनीला सत्ताधारी पक्षाने भाजपाच्या मदतीने बहुमताच्या जोरावर कंत्राट दिले. या कंपनीला व्हिडीओकॉन कंपनीचे ट्याब द्यायचे होते. परंतू काही विद्यार्थ्यांना व्हिडीओकॉन कंपनीचे ट्याब देण्या ऐवजी चायनामेड बोल्ड या कंपनीचे ट्याब वाटण्यात आले आहेत. बोल्ड कंपनीचे ट्याब २५०० रुपयांना असतान पालिकेने हे चायनामेड ट्याब ४८०० रुपयांना खरेदी केले आहेत. पालिकेने अद्याप २१ हजार बोल्ड कंपनीचे ट्याब विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात आले आहेत. पालिकेने व्हिडीओकॉन कंपनीचे ट्याब सांगून चायनामेड बोल्ड कंपनीचे ट्याब वितरीत केल्याने यामध्ये करोडो रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सईदा खान यांनी केला आहे. ट्याबमध्ये टाकण्यात आलेले सॉफ्टवेअर ५७१ रुपयांना टाकण्यात आले हे सॉफ्टवेअर मोफत मिळते असे सांगत ट्याबचा दोन वर्षाचा इन्शुरन्स असल्याचे सांगण्यात आले चायनामेड ट्याबचा इन्शुरन्स कसा देणार असा प्रश्न सईदा खान यांनी उपस्थित केला आहे.
पालिकेतील ट्याब घोटाळयाप्रकरणी पालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबई राष्ट्रवादी पक्षाचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली असून चोकशी न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा अहिर यांनी दिला आहे. सचिन अहीर यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार शुक्रवारी पालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ, सईदा खान आणि इतर नगरसेवकांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान राष्ट्रवादी पक्षाकडून आयुक्तांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात ट्याब वाटप करताना निविदेतील अटी व शर्तीचे उल्लंघन करून पालिकेची फसवणूक केली आहे. यामुळे ट्याब घोटाळ्याची चौकशी करावी आणि एफआयआर दाखल करावा अशी मागणी केली आहे. पालिका आयुक्तांनी दोन दिवसात चौकशी करून एफआयआर दाखल न केल्यास दोन दिवसांनी सोमवारी न्यायालयात जाण्याचा इशारा धनंजय पिसाळ यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment