पालिका अग्निशमन दल सर्व आपत्कालीन प्रसंगावर प्रभावीपणे मात करणारे दल – महापौर स्नेहल आंबेकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 December 2015

पालिका अग्निशमन दल सर्व आपत्कालीन प्रसंगावर प्रभावीपणे मात करणारे दल – महापौर स्नेहल आंबेकर



मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - 28 Dec 2015   
सीमेवर तसेच भारतीय सैन्यदलाचे जवान देशाच्या सुरक्षिततेसाठी झटतात, त्याच तोडीचे कार्य पालिका अग्निशमन दलाचे अधिकारी व अग्निशामक करीत असून, जेव्हा-जेव्हा मुंबईत दुर्घटना घडतात, तेव्हा-तेव्हा हे दल संपूर्ण ताकदीनिशी सांघिक भावना जपून मुंबईकरांच्या वित्त व जीवितहानीचे रक्षणासाठी झटते, असे प्रतिपादन मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी केले.


बृहन्मुंबई महानगरपालिका अग्निशमन दलाच्या वार्षिक अग्निकवायत स्पर्धा व पारितोषिक वितरण समारंभ भायखळा अग्निशमन केंद्र, बापूराव जगताप मार्ग, भायखळा (पश्चिम), मुंबई – ४०० ००८ येथे आज (दिनांक २८ डिसेंबर, २०१५) संपन्न झाला, त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.

याप्रसंगी बोलताना महापौर पुढे म्हणाल्या की, मुंबई अग्निशमन दल हे संपूर्ण मुंबईच्या नैसर्गिक व मानवनिर्मित संकटांवर मात करण्यासाठी अहोरात्र झटत असते, असे सांगून या खात्यातील कर्मचाऱयांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत सकारात्मक विचार करुन त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य पालिका प्रशासन करेल, अशी ग्वाहीही त्यांनी व्यक्त केली. मुंबईत विविध कारणांनी आगी लागण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्या विझविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करणारे सबळ व सक्षम दल म्हणून अग्निशमन दलाची ख्याती असल्याचेही महापौरांनी सांगितले. या वार्षिक अग्निकवायत स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळालेल्या अग्निशामक कर्मचारी व अधिकाऱयांचे त्यांनी अभिनंदन केले.

याप्रसंगी बोलताना महापालिका आयुक्त अजोय मेहता म्हणाले की, कोणत्याही आव्हानाला सामोरे जाणारे दल म्हणून मुंबई अग्निशमन दलाची जगभरात ख्याती असून त्यामुळे या खात्यावर नागरिकांचाही विश्वास आहे. कोणत्याही आपत्कालीन संकटांना सामोरे जाण्यासाठी नागरिक अग्निशमन दलालाच पाचारण करतात. मुंबईतील छोट्या-मोठ्या गल्ल्यांचा विचार करुन त्याप्रमाणे यंत्रसामुग्री मागवून अग्निशमन दल आणखी सुसज्ज करुन अग्निशमन दलाची कार्यक्षमताही वाढविण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad