मुंबई / अजेयकुमार जाधव / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - 17 Dec 2015
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य, विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावेत, बाबासाहेबांच्या स्मृती चिरंतन रहाव्यात यासाठी त्यांचं छायाचित्र व राज्यघटनेची माहिती असलेल्या नोटा चलनात आणाव्यात, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज विधान परिषदेत केली. या मागणीचा ठराव सभागृहात मंजूर करुन तो केंद्र व रिझर्व्ह बँकेकडे पाठविण्यात यावा, अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीवर्षाच्या 'डॉ. बाबासाहेबांचे 125 वे जयंतीवर्ष आणि भारतीय राज्यघटना' या विषयावर आज विधीमंडळात विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात विचार मांडतांना मुंडे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब हे आधुनिक भारताचे शिल्पकार आहेत. राज्यघटनेच्या माध्ममातून त्यांनी आधुनिक भारताचा भक्कम पाया रचला. त्यांचे कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत, नवीन पिढीपर्यंत पोहचणे गरजेचे असून त्यासाठी विशेष प्रयत्न होण्याची गरज आहे. डॉ. बाबासाहेबांचे छायाचित्र व राज्यघटनेची माहिती असलेल्या नोटा चलनात आणल्यास ती त्यांना कृतज्ञतापूर्ण आदरांजली ठरेल.
मुंडे पुढे म्हणाले की, आपल्या देशातील लोकशाही बळकट करण्याचे सामर्थ्य डॉ. बाबासाहेबांच्या विचारात आहे. समाजातील गरीब, वंचित, उपेक्षित, विद्यार्थी, युवक, महिला, दलित, आदीवासी, अल्पसंख्याक अशा सर्व घटकांचा विचार करुन डॉ.बाबासाहेबांनी तयार केलेली राज्यघटना हा आपल्या देशाचा सर्वोच्च धर्मग्रंथ आहे. तर संसद आणि विधानमंडळे ही प्रार्थनास्थळे आहेत. त्यांचं पावित्र्य राखणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे.
मुंडे यांनी आपल्या भाषणात बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलु सांगितले. ते म्हणाले की, बाबासाहेब हे उपेक्षित घटकांची बाजू मांडणारे वकील होते. ते आंतरराष्ट्रीय किर्तीचे अर्थतज्ञ होते. दूरदृष्टीचे नेते होते. थोर विचारवंत होते. समाजशास्त्रज्ञ होते. प्रौढ मतदान पद्धती, प्रशासकीय व्यवस्थेची निर्मिती, किमान वेतन कायदा, महिलांना समानतेचा अधिकार, मागासवर्गीयांसाठी राखीव जागा, अल्पसंख्यंकांचे शैक्षणिक व सांस्कृतिक हक्क अशा अनेक मुद्यांचा सखोल विचार करुन डॉ. बाबासाहेबांनी आपली राज्यघटना तयार केली आहे. जगभरातील लोकशाही व्यवस्था धोक्यात आली असताना विविधतेने नटलेल्या आपल्या देशात ती दिवसेंदिवस भक्कम होत आहे हेच डॉ. बाबासाहेबांचं व राज्यघटनेचं मोठेपण आहे, असे गौरवोद्गारही मुंडे यांनी काढले.
No comments:
Post a Comment