मुंबई / अजेयकुमार जाधव / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - दि. 14 डिसेंबर –
मुंबईच्या मालाड मार्वे येथील एका खाडी असलेल्या भूखंडावर जैसे थे परिस्थिती ठेवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आणि जिल्हाधिकारी मुंबई उपनगर यांनी या भूखंडावर किंवा अतिक्रमण केल्यास गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले असताना या आदेशांना केराच्या टोपलीत टाकत मार्वे पटेलवाडी समोरील खाडी असलेल्या भूखंडावर भरणी टाकून खाडी बुजवली जात आहे. यामुळे येथील स्थानिक रहिवाश्यांच्या मलनिस्सारण वाहिन्याही बंद केल्याने रहिवाश्यांनी पालिकेने कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
मालाड मार्वे येथे पटेलवाडी समोरील खाडी असलेला ११४ एकरचा भूखंड इंडिया फार्मर्स प्रा. लि. या कंपनीला १९५० साली राज्य सरकारने भाडेपट्ट्याने दिला होता. परंतू कंपनीने नियम व अटींचे पालन न केल्याने हा करार राज्य सरकारने रद्द केला आहे. या भूखंडाचा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला असता सर्वोच्च न्यायालयानेही जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश (सिव्हिल अपील ५९४७ ऑफ २००७) सन २०११ साली दिले आहेत. यालाच अनुसरून मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी यांनी (पत्र क्रमांक - सी / कार्या - ३ डी /एल -३९० /३४५ दिनांक ८ मे २०१५ ) मालवणी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना पत्र पाठवून या भूखंडावर अतिक्रमण झाल्यास गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.
तरीही इंडिया फार्मर्स प्रा. लि.चे मालक नबीनचंद मजेठीया आणि त्यांचा मुलगा मनीष मजेठीया यांनी या भूखंडाला पत्र्याचे कुंपण घालून मातीचे ढीग टाकून खाडी बुजवण्यास सुरु केली आहे. याचा परिणाम म्हणून येथील पटेलवाडी आणि इतर रहिवाश्यांच्या मलनिस्सारण करणाऱ्या वाहिन्या बंद झाल्या आहेत. मलनिस्सारण करणाऱ्या वाहिन्यामधून मलनिस्सारण योग्य प्रकारे होत नसल्याने स्थानिक रहिवाश्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत स्थानिक पोलिस ठाणे पालिका कार्यालयात तक्रारी करूनही दुर्लक्ष केले जात आहे.
याबाबत येथील स्थानिक रहिवाशी असलेल्या प्रेमा डयारीयल गोम्स यांनी मुख्यमंत्री, पर्यावरण मंत्री, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महापौर, पालिका सभागृह नेत्या, स्थायी अमिती अध्यक्ष, विरोधी पक्ष नेते, महानगरपालिका आयुक्त, प्रभाग समिती अध्यक्ष, सहाय्यक पालिका आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. तसेच पालिकेच्या १९१६ या क्रमांकावर तक्रार केल्यावर सहाय्यक अभियंता सांगळे आणि म्हस्के हे दोघे अधिकारी आले मात्र त्यांनी अशी कोणतीही भर टाकली जात नसल्याचा अहवाल कार्यालयाला दिला. परंतू याबाबत प्रभाग समिती अध्यक्ष विनोद शेलार यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी सहाय्यक आयुक्त संगीता हसनाळे यांना घेवून या भूखंडाच्या ठिकाणी भेट दिली असता माती खाली करणारे दोन ट्रक आणि एक जेसीबी ताब्यात घेतली आहे. यामुळे स्थानिक प्रशासन अतिक्रमण करणाऱ्यांना पाठीशी घालत असल्याने स्थानिक रहिवाश्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.
No comments:
Post a Comment