मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - ८ डिसेंबर २०१५
कांदिवली येथील दामुनगर झोपडपट्टीला लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत द्या. तसेच या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या कुटुंबांचे त्याच ठिकाणी पक्की घरे बांधून पुनर्वसन करा,अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी राज्य सरकारकडे केली आहे. मंगळवारी सकाळी अहिर यांनी दामुनगर भागाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते.
सोमवारी दुपारच्या सुमारास दामुनगर येथे भीषण आग लागली होती. या आगीत अनेकांचे संसार अक्षरश: भस्मसात झाले. झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सचिन अहिर यांनी या भागाला भेट दिली. या भेटीदरम्यान माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, एवढ्या मोठ्या दुर्घटनेनंतर सरकारच्या वतीने अपेक्षित असलेली मदत होत नसल्याचे आम्हाला दिसून आले आहे. त्यामुळे लवकरात लवकर या दुर्घटनेतील पिडीतांना सरकारने शक्य ती सर्व मदत करावी असे आवाहन आम्ही करतो. या आगीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटंुबियांना प्रत्येकी पाच लाख, जखमींच्या कुटंुबियांना प्रत्येकी एक लाख आणि ज्यांची घरे या आगीत भस्मसात झालीत, त्यांना घरटी किमान पन्नास हजारांची तातडीची आर्थिक मदत सरकारने द्यावी, अशी मागणी अहिर यांनी यावेळी केली.
तसेच ज्या प्रमाणे आघाडी सरकारच्या काळात आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या वांद्रे येथील नर्गीस दत्त नगरचे आम्ही पुनर्वसन केले, त्याच धर्तीवर या आगीत घर जळालेल्या प्रत्येकाचे त्याच जागेवर पुनर्वसन करावे, असेही ते म्हणाले. या भेटीदरम्यान त्यांनी मृतांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या भेटीदरम्यान अहिर यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्याताई चव्हाण, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ आणि जिल्हाध्यक्ष इंद्रपाल सिंग यांच्यासह स्थानिक पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पिडीतांना तातडीची मदत
या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या पिडितांना पक्षाच्या वतीने दोन हजार ब्लँकेटसचे वाटप करण्यात आले. तसेच येत्या दोन दिवसांत आवश्यक भांडी,चटया आणि इतर गृहोपयोगी वस्तुंचे वाटप करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment