कांदिवलीच्या मनपा शाळेतील शिवम विश्वकर्मा राज्यातील सर्वेात्कृष्ट मुष्टियोद्धा
मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - 17 Dec. 2015
राज्यस्तरीय मुष्टियुद्ध (बॉक्सिंग) स्पर्धेत ३ सुवर्ण, २ रौप्य व ३ कास्य पदकांसह बृहन्मुंबई महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी आपला ठसा उमटवला असून कांदिवलीच्या आर. आर. पी. मनपा हिंदी शाळेतील विद्यार्थी शिवम दिनेश विश्वकर्मा यांस १७ वर्षाखालील गटामध्ये सर्वेात्कृष्ट मुष्टियोद्धा म्हणून गौरविण्यात आले आहे. तर सुवर्णपदक विजेत्या ३ विद्यार्थ्यांची आता राष्ट्रीय स्पर्धेसाठीची निवड निश्चित झाली असून यामध्ये शिवम दिनेश विश्वकर्मा,अमन संदिप यादव व विनय रामचंद्र विश्वकर्मा यांचा समावेश आहे.
वैयक्तिक स्तरावर आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक गटातील अनेकजण महापालिका शाळातून शिक्षण घेत असतात. त्याचसोबत अनेकजण महापालिकेच्या शारिरीक शिक्षण विभागातून क्रीडा विषयक नैपुण्य देखील प्राप्त करित असतात. याचप्रकारे मुष्टियुद्ध (बॉक्सिंग) या क्रीडा प्रकारात नैपुण्य मिळविणा-या आणि जिल्हा व विभागीय स्तरावर यापूर्वीच निवड झालेल्या महापालिका शाळातील ११ विद्यार्थांनी भंडारा शहरामध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या राज्यस्तरीय मुष्टियुद्ध स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे यापैकी ३ विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक पटकावले असून सलीम मो. शब्बीर अन्सारी व अनिल मानसिंह या दोन विद्यार्थ्यांना रौप्य पदकाने गौरविण्यात आले आहे. तर गुलफाम मकसुद आलम मन्सुरी, रूपेशकुमार राजेशकुमार बिंद व दानिश चौधरी या तीन विद्यार्थ्यांना कास्य पदकाने गौरविण्यात आले. याबाबतचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.
सुवर्णपदक विजेते विनय रामचंद्र विश्वकर्मा याच्या वडिलांचा सुतारकामाचा व्यवसाय आहे तर आई शिवणकाम करते. अमन यादवचे वडिल ट्रक ड्रायव्हर असून आई गृहिणी आहे. शिवम दिनेश विश्वकर्माचे वडिल चित्रपट क्षेत्रात नेपथ्यविषयक कामे करतात तर आई शिवणकाम करते. रौप्यपदक विजेता सलीम मो. शब्बीर अन्सारी यांस रौप्यपदकाने गौरविण्यात आले. सलीम चे वडिल बांधकाम कामगार म्हणून काम करतात, तर आई इतरांच्या घरची घरकामे करतात. अनिल मानसिंह याचे वडिल सुरक्षारक्षक असून आई इतरांच्या घरची घरकामे करतात.
या सर्व विद्यार्थ्यांचे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. पल्लवी दराडे, शिक्षणाधिकारी शांभवी जोगी व शारिरीक शिक्षण विभागाचे ज्येष्ठ पर्यवेक्षकरामेश्वर लोहे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच सुवर्णपदक पटकावणा-या ज्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे, त्यांना देखील पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यस्तरीय मुष्टियुद्ध (बॉक्सिंग) स्पर्धेत सहभागी झालेल्या महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक निलेश लक्ष्मण चुरी, जितीन पाटील, उदय मोहोड, रघुनाथ दवणे, सुनिल चौधरी, वैशाली टंकसाळी व हेमलता म्हात्रे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले होते.
No comments:
Post a Comment