मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - 26 Dec 2015
भाडुंप पश्चिम येथील व्हिलब्रेटर कंपनीच्या जागेवर पुनर्विकास प्रकल्प राबवण्यात आल्यामुळे नागरी सुविधा अंतर्गत महापालिकेला एक हजार चौरस मीटरचा भूखंड प्राप्त होणार आहे. त्यामुळे भांडुपमधील स्मशानभूमींची गरज लक्षात घेता या ठिकाणी संयुक्त स्मशानभूमीची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींकडून होत आहे. या कंपनीच्या जागेवर विकास करताना स्मशानभूमी आणि दफनभूमीचे आरक्षणच उठवण्यात आले असून महापालिकेला प्राप्त होणा-या जागेवरही कोणतेही आरक्षण नव्या विकास नियोजन आराखडय़ात दाखवलेले नाही. त्यामुळे भांडुपमध्ये संयुक्त स्मशानभूमी होऊ नये याकरता महापालिकेने विकासकाला मदत केल्याचे उघड होत आहे.
भांडुप पश्चिम येथील लालबहादूर शास्त्री मार्गालगत असलेल्या व्हिलॅब्रेटर कंपनीच्या जागेवर पुनर्विकास झाल्यामुळे त्याठिकाणी महापालिकेला प्राप्त होणा-या भूखंडावर मुलुंडच्या धर्तीवर हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन यांच्यासाठी संयुक्त स्मशानभूमी बांधली जावी, याबाबतची मागणी तत्कालीन आमदार शिशिर शिंदे यांनी २०१४मध्ये केली होती. या मागणीनुसार स्थानिक नगरसेविका वैष्णवी सरफरे यांनी सुधार समितीमध्ये हा प्रश्न उपस्थित करत ही मागणी लावून धरली होती.
नाहूर, भांडुप आणि कांजूर या तिन्ही भागांमध्ये मागील सात वर्षामध्ये झपाटय़ाने लोकसंख्या वाढलेली आहे. या ठिकाणी पाच लाख लोकवस्तीसाठी भांडुप सोनापूर ही एकमेव हिंदू स्मशानभूमी आहे, तसेच मुस्मिलांसाठी भांडुप सर्वोदयनगर येथे कब्रस्तान आहे तर ख्रिश्चनांसाठी पवई येथे दफनभूमी आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर नाहूर, भांडुप, कांजूर परिसरातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असल्याची बाब शिंदे आणि सरफरे यांनी मांडली होती.
या मागणीच्या अनुषंगाने प्रशासनाने यावर सकारात्मक भूमिका घेतली आहे. एस विभागाच्या प्रारूप विकास आराखडा (२०३४)नुसार एकूण ३८१९२.१२ चौरस मीटर एवढे क्षेत्र हे स्मशानभूमी आणि दफनभूमीकरता आरक्षित असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. यामध्ये स्मशानभूमीसाठी १०६२७.७२ चौरस मीटर तर दफनभूमीसाठी ६३८६.०८ चौरस मीटर एवढे क्षेत्र नामनिर्देशित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भविष्यातील लोकसंख्येच्या अनुषंगाने स्मशानभूमी आणि दफनभूमीकरता योग्य ती तरतूद करण्यात आली असून हा आरक्षित तथा नामनिर्देशित भूभाग संयुक्त स्मशानभूमीकरता वापरता येऊ शकतो, असे विकास नियोजन विभागाने स्पष्ट केले आहे. व्हिलॅब्रेटर कंपनीच्या औद्योगिक पट्टय़ातील जागेवर निवासी वापरासाठी बांधकाम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार विकासकाला १०२९४ इतकी (२५ टक्के) जागा हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) यांच्या मोबदल्यात महापालिकेला हस्तांतरित करायची आहे.
टीडीआरच्या बदल्यात महापालिकेला हस्तांतरण करण्याच्या प्रस्तावावर विकास नियोजन विभागाच्या वतीने कार्यवाही सुरू असल्याचे विभागाने स्पष्ट केले असून या हस्तांतरित होणा-या १० हजार चौरस मीटरच्या क्षेत्रावर कोणतेही आरक्षण अथवा नामनिर्देशन दाखवले गेले नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे भांडुपमधील संयुक्त स्मशानभूमीची मागणी पूर्ण होणार नसून स्मशानभूमीमुळे आपल्या विकास प्रकल्पाला चांगल्याप्रकारे प्रतिसाद मिळणार नसल्यामुळे हे आरक्षणच बदलून टाकण्यात आले आहे.
त्यामुळे या भूखंडाचा विकास झाल्यानंतर महापालिकेला हस्तांतरित झालेल्या जागेवर स्मशानभूमी आणि दफनभूमीचे आरक्षण असणे आवश्यक असतानाही त्या जागेवरील आरक्षणच हटवून येथील संयुक्त स्मशानभूमीचा मार्ग बंद करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, सभोवतालच्या परिसरातील निकड व गरज लक्षात घेऊन ही जागा स्मशानभूमी आणि दफनभूमी वापरासाठी आरक्षित ठेवण्यासाठी पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे विकास नियोजन विभागाने स्पष्ट केले आहे.
No comments:
Post a Comment