मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - 18 Dec 2015
वर्ष २०१६ च्या येणा-या पावसाळ्यात मुंबईकरांना पाऊस-पाणी संबंधित अडचणींचा त्रास होऊ नये, यासाठी गेल्या पावसाळ्यात आलेल्या अडचणींचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करुन सुयोग्य उपाययोजना अंमलात आणाव्यात; तसेच याकरिता आवश्यक तो कृती आराखडा पुढील १५ दिवसात सादर करावा, असे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी महापालिकेच्या सर्व ७ परिमंडळांचे उपायुक्त व संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प) यांना दिले आहेत.
वर्ष २०१६ च्या पावसाळ्याच्या अनुषंगाने पावसाळा पूर्वतयारी विषयक पहिली नियोजन बैठक आज (दि. १८ डिसेंबर २०१५) रोजी महापालिका मुख्यालयात संपन्न झाली. या बैठकीदरम्यान सर्व परिमंडळीय उपायुक्तांनी त्यांना गेल्या पावसाळ्यात आलेल्या अडचणी,त्यांच्या क्षेत्रातील पाणी साचण्याची ठिकाणे व तत्सम बाबी याबाबत महापालिका आयुक्तांना माहिती दिली. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी सदर अडचणी २०१६ च्या पावसाळ्यात उद्भवणार नाही, यासाठी काय करणे आवश्यक आहे, याबाबतचा संबधित कृती आराखडा पुढील १५ दिवसात सादर करावा, असे आदेश सर्व परिमंडळीय उपायुक्तांना दिले. तसेच अंमलबजावणीच्या अनुषंगाने काही अडचणी असल्यास त्याबाबत परिमंडळीय उपायुक्त यांनी पुढाकार घेऊन महापालिकेच्या संबंधित अधिका-यांसोबत संयुक्त पाहणी दौरे आयोजित करावेत, असेही आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.
आज संपन्न झालेल्या पावसाळा पूर्वतयारी विषयक बैठकीला अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) एस. व्ही. आर. श्रीनि वास, सह आयुक्त / उप आयुक्त (आपत्ती व्यवस्थापन) शांताराम शिंदे, सर्व सात परिमंडळांचे उपायुक्त, संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प) व प्रमुख अधिकारी (आपत्ती व्यवस्थापन) उपस्थित होते.
No comments:
Post a Comment