लाखो भीम अनुयायांचा अथांग भीमसागर चैत्यभूमीवर नतमस्तक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 December 2015

लाखो भीम अनुयायांचा अथांग भीमसागर चैत्यभूमीवर नतमस्तक

मुंबई / अजेयकुमार जाधव
माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देणारे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापारीनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यास आलेल्या देशभरातील लाखो भीम अनुयायांचा अथांग सागर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समोर नतमस्तक झाला. 

महापरिनिर्वाण दिनानिमित्त १ डिसेंबर पासून आंबेडकरी अनुयायी देशाच्या काना कोपऱ्यातून मुंबईच्या चैत्यभूमी परिसरात अभिवादन करण्यासाठी येवू लागले होते. चैत्यभूमीवरील अभिवादनाची रांग शनिवारी (ता. 5) संध्याकाळपासून वाढू लागली, ही रांग रविवारी ६ डिसेंबर रोजी प्रभादेवीपर्यंत आणि नंतर वरळी नाक्या पर्यंत पोहचली होती. रांगेमध्ये ६ ते ८ तास उभे राहून शांत पणे बाबासाहेबांपुढे भीम अनुयायी नतमस्तक होते होते. तासनतास रांगेमध्ये उभ्या असलेल्या भीम अनुयायांना विविध संस्था पाणी वाटप करून मदत करत होते. 

दादर रेल्वे स्थानकाच्या पश्‍चिमेकडून चैत्यभूमीकडे जाणारे सर्व रस्ते तुडुंब भरले होते. गर्दीचा शिस्तबद्ध जनसागर चैत्यभूमीकडे कूच करत होता. समता सैनिक दल आणि भारतीय बौद्ध महासभेच्या स्वयंसेवकामुळे पोलिसांना गर्दीचे नियमन करण्यासाठी फार प्रयत्न करावे लागत नव्हते. खेड्यापाड्यांतून आलेल्या अनुयायांसाठी भोजनाची, तसेच आरोग्याच्या तपासणीची व्यवस्था विविध संस्था - संघटनांनी केली होती. 


राज्य सरकारचा सामाजिक न्याय आणि विशेष साह्य विभाग विविध योजनांची माहिती देत होता. भारतीय रिझर्व्ह बॅंकेने विशेष वित्तीय साक्षरता अभियान राबवले. बेस्ट, ओएनजीसी, हिंदुस्थान पेट्रोलियम, माझगाव डॉक एससी- एसटी संघटना, बेस्ट उपक्रम, धर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्र, भू-अभिलेख अधिकारी संघटना, यूथ रिपब्लिकन आदी संस्था- संघटना- कंपन्यांनी भोजन आणि आरोग्य तपासणीची व्यवस्था केली होती. देशभरातून आलेल्या विविध पुस्तक प्रकाशन संस्थांच्या शिवाजी पार्कवरील स्टॉल्सवर खरेदीसाठी प्रचंड गर्दी दिसून आली. बाबासाहेब आणि तथागत बुद्ध यांच्या प्रतिमा, पुतळे आणि सीडींची विक्रमी विक्री झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. 


यांनी केले अभिवादन 

केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापौर स्नेहल आंबेकर, शिक्षणमंत्री विनोद तावडे, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, उपमहापौर अलका केरकर, महापालिका आयुक्त अजोय मेहता, मुंबई शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई, खासदार रामदास आठवले, अशोक चव्हाण, राहुल शेवाळे, आमदार प्रकाश गजभिये भाई जगताप, माजी मंत्री चंद्रकान हंडोरे, वर्षा गायकवाड, माझी खासदार एकनाथ गायकवाड, हुसेन दलवाई, संजय निरुपम, प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, माजी महापौर महादेव देवळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबई महापालिका गटनेते संदीप देशपांडे, कॉंग्रेसच्या नगरसेविका शितल म्हात्रे आदींनी चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केले. 

राज्यघटनेच्या प्रतींना मोठी मागणी
विविध पुस्तक प्रकाशन संस्थांनी शिवाजी पार्कवर लावलेल्या स्टॉलवर खरेदीसाठी प्रचंड गर्दी होती. असहिष्णुतेचा मुद्दा गाजत असल्याने राज्यघटनेच्या प्रतींची चैत्यभूमीवर विक्रमी विक्री झाल्याचे सांगण्यात आले. बाबासाहेब आणि तथागत बुद्ध यांच्या प्रतिमा, पुतळे आणि सीडी यांची मोठ्या संखेने विक्री झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. 

मुस्लिमांनी बनवलेल्या प्रतिमां खरेदीसाठी गर्दी 

चैत्यभूमीवर आंबेडकरी अनुयायींनी गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चायनामेड व मार्बलच्या प्रतिमा खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. खास अजिंठा येथून या प्रतिमा मागविण्यात आल्या आहेत. मार्बलपासून बनविण्यात आलेल्या प्रतिमा भीमसैनिकांचे मुख्य आकर्षण ठरत होत्या. त्या बनविण्यासाठी कमीत कमी तीन दिवस लागतात, असे एका विक्रेत्याने सांगितले. या प्रतिमा फक्त अजिंठा - वेरूळ येथेच बनविल्या जातात. काही खास निमित्तानेच त्या विक्रीस उपलब्ध असतात. अगदी 50 रुपयांपासून दोन हजारपर्यंत त्यांची विक्री होते. प्रत्येक प्रतिमेमागे साधारण 100 ते 200 रुपये मूर्तीविक्रेत्यांना मिळतात. विशेष म्हणजे आकर्षक प्रतिमा बनविणारे बहुतांश कलाकार हे अजिंठा-वेरूळमधील मुस्लिम परिवारातील आहेत. 

मुस्लिम समाजाकडून बाबासाहेबांना अभिवादन 
बाबासाहेब आंबेडकर यांना फक्त बौद्ध समाजच मानतो हा समाज फुसून काढत शेकडो मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर आणि रमेश जाधव यांच्या उपस्थितीमध्ये चैत्यभूमी येथे येवून अभिवादन केले. बाबासाहेब फक्त एकट्या बौद्ध धर्मियांचे नसून सर्व भारतीयांचे आहेत. बाबासाहेबांनी राज्य घटना लिहून सर्वाना समान अधिकार दिले आहेत. बाबासाहेबांचे काम मोठे आहे म्हणून आम्ही मुस्लिम समाजातील लोकांनी एकत्र येवून अभिवादन केल्याचे सांगितले.  

समता सैनिक दलाने राखली सुव्यवस्था
महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरमध्ये देशभरातून लाखो अनुयायींचा जनसागर लोटलेला असताना पोलिस प्रशासनाबरोबर हातात हात घालत समता सैनिक दलाने सुरक्षा अन्‌ सुव्यवस्थेची चोख भूमिका बजावली. देशभरातील समता सैनिक दलाच्या हजारो सैनिकांनी दोन दिवसांपासून चैत्यभूमीवर कायदा-सुव्यवस्था, वाहतूक व रांगेचे नियोजन अतिशय उत्तमप्रकारे केले. 

नशाविरोधी मोहीम
"सिटीझन ऍलर्ट‘ संस्थेच्या वतीने शिवाजी पार्कमध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य व मुंबई पोलिसांच्या सहकार्याने नशेविरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली. असोदिअम परफॉर्मिंग आर्टस्‌च्या वतीने या वेळी पथनाट्य सादर करण्यात आले. संस्थेने दिवसभरात 30 हून अधिक पथनाट्ये सादर केली; त्यात तरुणांचा विशेष सहभाग होता. पथनाट्यांना उपस्थितांचा चांगला प्रतिसाद मिळाला. प्रयोगानंतर उपस्थितांना नशाविरोधी संदेशाची प्रतिज्ञा देण्यात आली. जागृती करणारी पत्रकेही वाटण्यात आली

ऍट्रॉसिटी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पोस्टकार्डांची मोहीम
दलितांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी करीत "नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस‘ संघटनेने महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर आलेल्या लाखो आंबेडकरी अनुयायींकडून एक लाख पोस्टकार्डे लिहून घेण्याचा संकल्प केला. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दलितांसाठी असलेल्या ऍट्रॉसिटी कायद्याची माहिती या वेळी देण्यात आली. हि एक लाख सह्या असलेली पोस्टकार्डे मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणार आहेत. ऍट्रॉसिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक विभागात जलदगती न्यायालय स्थापन करण्याची मागणी करण्यात येणार आहे. 

सामाजिक न्याय विभागाच्या संकेतस्थळाचे लोकार्पण 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 59 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने सामाजिक न्याय विभागाचे संकेतस्थळ www.sjsa.maharashtra.gov.in आणि फेसबुक पेजचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दादर चैत्यभूमी येथे करण्यात आले. या संकेतस्थळ आणि फेसबुकच्या माध्यमांमुळे सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती सामान्य माणसांना मिळण्यास मदत होणार आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी महापौर स्नेहल आंबेकर, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, आमदार भाई गिरकर, उपमहापौर अलका केरकर, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव उज्ज्वल उके, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. पल्लवी दराडे, समाजकल्याण आयुक्त पियुष सिंह उपस्थित होते.







No comments:

Post a Comment

Post Bottom Ad