मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबईमधील नालेसफाईमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाल्या नंतर पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी चौकशी समिती नेमली होती. या चौकशी समितीचा अहवाल स्थायी समिती, पालिका सभागृहापुढे न येता वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाल्याने संतप्त झालेल्या स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी पत्रकार परिषद घेवून केली आहे. पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी आपल्या हाता खालील अधिकाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची जबाबदारी घेवून राजीनामा द्यावा अन्यथा आम्हाला आयुक्तांना परत पाठवण्यासाठी पुढील पाऊले उचलावी लागतील असे सांगितले.
मुंबई महानगरपालिकेकडून दर वर्षी नाले सफाई केली जाते. नाले सफाई करताना नेमका गाळ किती काढला जातो आणि कुठे टाकला जातो असा प्रश्न उपस्थित करून स्थायी समिती आणि सभागृहात नालेसफाई मध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. यावर पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी चौकशी समिती नेमली होती. या चौकशी समितीने कंत्राटदारांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह उपस्थित करत कंत्राटदारांना दोषी ठरवले होते. याच चौकशी समितीने या भ्रष्टाचारात पालिका अधिकारीही सामील असल्याचा ठपका ठेवला आहे. समितीने आपला अहवाल तयार करून पालिका आयुक्तांकडे सदर केला असता हा अहवाल आयुक्तांनी स्थायी समिती किंवा पालिका सभागृहापुढे ठेवणे गरजेचे असताना हा अहवाल सादर होण्या आधीच मिडीयामध्ये प्रसिद्ध झाल्याने स्थायी समितीच्या अधिकारांना आयुक्त जुमानत नसल्याचा आरोप फणसे यांनी केला आहे. पालिका आयुक्त आमचे साधे ऐकून सुद्धा घेत नाहीत अशी तक्रार फणसे यांनी पत्रकारांकडे केली.
पालिका आयुक्त कार्यालयात सादर झालेला अहवाल आयुक्तांच्या कार्यालयातूनच फुटला आहे. यांच्या चौकशीची मागणी करणारे पत्र आयुक्ताना दिले असून अहवाल फोडणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी आणि तसा अहवाल सादर करावा अशी मागणी केली असल्याचे फणसे यांनी सांगितले. नालेसफाई झाली आसे पुन्हा एकदा स्पष्ट करत गाळ किती काढला आणि कुठे टाकला हा नेमक प्रश्न असल्याचे फणसे यांनी सांगितले. दरवर्षी पावसाळ्यात ६ हजार म्याट्रिक टन गाळ काढला जातो. मात्र आधीच १० हजार म्याट्रिक टन गाळाचे पैसे मंजूर करून घेतले जातात असे सांगून कामापेक्षा जास्त पैसे मिळवण्यासाठी भ्रष्टाचार केला जातो असे फणसे म्हणाले.
No comments:
Post a Comment