मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - दि. ११ डिसेंबर –
बृहन्मुंबई महापालिकेच्या `इ' प्रशासकीय विभागांतर्गत असणा-या ताडवाडी येथील महापालिकेच्या मालकीच्या असणा-या व अत्यंत मोडकळीस आलेल्या बी.आय.टी. चाळ इमारत क्र. १३ ते १६ या इमारतीतील भाडेकरुंनी महापालिकेने उपलब्ध करुन दिलेल्या पर्यायी जागेत स्थलांतरित व्हावे, असे आदेश मा. सर्वोच्च न्यायालयाने संबंधित प्रकरणी सुनावणी दरम्यान दिले आहेत.
महापालिकेने उपलब्ध करुन दिलेल्या माहूल परिसरातील पर्यायी सदनिका ह्या राहण्यायोग्य असल्याचा अहवाल मा. सर्वोच्च न्यायालयाने गठीत केलेल्या समितीने यापूर्वीच सर्वेाच्च न्यायालयास सादर केला होता. ताडवाडी परिसरातील महापालिकेच्या मालकीच्या बी.आय.टी. चाळीच्या पुनर्विकासाबाबत मा. सर्वोच्च न्यायालयात खटला सुरु असून अत्यंत मोडकळीस आलेल्या इमारत क्र. १३ ते १६ या इमारतीतील भाडेकरुंना महानगरपालिकेने पर्यायी जागा म्हणून माहूल (चेंबूर) येथे पर्यायी जागा देऊ केल्या होत्या. परंतू माहूल येथे सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने त्या राहण्यायोग्य नसल्याचा मुद्दा माझगांव ताडवाडी बी.आय.टी चाळ निवासी वसाहत कृती समितीने सर्वोच्च न्यायालयासमोर उपस्थित केला होता.
त्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने तीन सदस्यीय समितीची नियुक्ती केली होती. सदर समितीने माहूल येथील पर्यायी जागेची पहाणी करुन आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयास सादर केला आहे. ज्यामध्ये माहूल येथील सदनिका राहण्यायोग्य असल्याची बाब नमूद करण्यात आली आहे. तसेच सदर ठिकाणी उपलब्ध असलेल्या बाजार (मार्केट), शाळा, बस थांबे (बस स्टँड), रेल्वे स्टेशन, मोनो रेल स्टेशन, इत्यादी सुविधांचाही उल्लेख समितीने आपल्या अहवालात केला आहे. मा.सर्वोच्च न्यायालयाने सदर अहवाल ग्राहय धरुन ईमारत क्र. १३ व १४ मधील तिस-या मजल्यावरील भाडेकरुंनी २ आठवडयाच्या आत व इमारत क्र. १४ मधील इतर भाडेकरु, ईमारत क्र. १५, १६ मधील सर्व भाडेकरुंनी दि. १० जानेवारी २०१६ पर्यत स्थंलातरित व्हावे असे आदेश दिले आहेत.
No comments:
Post a Comment