मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - 26 Dec 2015
निविदेतील अटी व शर्तीनुसार सहा महिन्यांच्या आत या संस्थेने सीटी स्कॅन आणि एमआरआयची उभारणी न केल्यामुळे त्यांचे कंत्राट रद्द करण्यात आले आहे. या संस्थेने मागील दोन वर्षापासून महापालिकेला झुलवत ठेवले होते.
मुंबई महापालिकेच्या बहुतांश उपनगरीय रुग्णालयांमध्ये विविध आजार तसेच अपघातांची चाचणी करण्यासाठी सीटी स्कॅन आणि एमआरआय सुविधा नसल्यामुळे प्रशासनाने खासगी सहभाग तत्त्वावर या सेवा सुरू करण्याचे कंत्राट देण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानुसार कुर्ला भाभा, मुलुंडमधील एम.टी. अगरवाल आणि घाटकोपरमधील राजावाडी या तीन रुग्णालयांमध्ये स्वखर्चाने सीटी स्कॅन व एमआरआय मशीन स्थापन करून आवश्यक डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचारी उपलब्ध करून देण्याचे कंत्राट मेसर्स उबेर इंक मेडिकल सव्र्हिसेस या संस्थेला देतानाच, यासाठी लागणारी जागा दहा वर्षाकरता प्रतिवर्ष एक रुपया नाममात्र भाडेकरारावर देण्यात येणार होती. त्याबदल्यात या सेवा महापालिकेने निश्चित केलेल्या दराप्रमाणे देणे या संस्थेला बंधनकारक असेल, अशा प्रकारच्या अटींचा समावेश त्यामध्ये करण्यात आला होता.
यामध्ये मुलुंड अगरवाल रुग्णालयात एक हजार चौरस फुटांची जागा सीटी स्कॅन मशीन उभारण्यासाठी, तर कुर्ला पश्चिम येथील भाभा रुग्णालयातील एक हजार चौरस मीटरच्या जागेवर सीटी स्कॅन आणि राजावाडी रुग्णालयातील दीड हजार चौरस फुटांच्या जागेवर एमआरआय केंद्र स्थापन करण्याचे कंत्राट या संस्थेला देण्यात आले होते.
परंतु यापैकी अगरवाल रुग्णालयाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे त्याऐवजी गोवंडीतील पंडित मदनमोहन मालवीय रुग्णालयातील एक हजार चौरस फुटाच्या जागेवर सीटी स्कॅन मशीन बसवण्यास परवानगी देण्यात आली होती.
परंतु सुधार समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतरही ‘उबेर’कडून कोणत्याही प्रकारची हालचाल करण्यात आली नाही. त्यामुळे अखेर कंत्राटच रद्द करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून याबाबतचा झालेला ठरावही रद्द करण्यात येत आहे. त्यामुळे याबाबतचा प्रस्तावही आता मागे घेण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment