मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - मुंबई महानगरपालिकेच्या अनुकंपा भरती घोटाळ्याप्रकरणी मुख्य पर्यवेक्षकासह ५ जण सध्या गुन्हे शाखेच्या ताब्यात आहेत. या आरोपींच्या चौकशीमध्ये ४०० पेक्षा अधिक बोगस उमेदवार सध्या पालिकेत कार्यरत असल्याची माहिती समोर आली. गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या घरांच्या झडतीत या भरती प्रक्रियेत वापरण्यात येत असलेले बनावट स्टॅम्प, परवानगी पत्रांसह महत्त्वपूर्ण कागदपत्रांचा दस्तऐवज पोलिसांनी हस्तगत केला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
मुंबई महानगरपालिकेत अनुकंपा तत्त्वावर भरती करण्यात येणाऱ्या चतुर्थ श्रेणीतील सफाई कामगारांच्या भरती घोटाळ्याप्रकरणी डी विभागाचा मुख्य पर्यवेक्षक देवजी प्रेमजी राठोडसह दलाल सनी विनोद विंजुडा, कुणाल नागजी जोगदिया, लिपिक दिलीप चौकेकर, शिपाई अनिल कांजी बारिया यांना अटक करण्यात आली आहे. अटकेतील आरोपींपैकी सनी हा दलाल असल्याचे बोलले जात असतानाच हा सनी दलाल नसून, पालिकेच्या डी विभागातील सफाई कामगार असल्याची माहिती तपासात उघड झाली. पालिकेच्या २४ वॉर्डमध्ये कार्यरत असलेल्या गेल्या ५ वर्षांतील उमेदवारांच्या माहितीचा शोध गुन्हे शाखेकडून घेण्यात येत आहे. त्यामुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांसह बोगस उमेदवारांच्या तोंडचे धाबे दणाणले आहे. अटक आरोपींच्या घरझडतीमध्ये बोगस उमेदवारांचे ३ अर्ज मिळाले असून या संदर्भात तपास सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेतर्फे मिळाली आहे.
No comments:
Post a Comment