मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - राज्यात पडलेल्या दुष्काळ निवारणासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा विभागाने पुढाकार घेतला आहे. राज्यातील दोन नद्यांना पुनर्जीवन देऊन ६० गावांमध्ये बंधारे बांधण्याचा संकल्प संघाने केला आहे.
जल संवर्धन करणाऱ्या २३ संस्थांच्या मदतीने दुष्काळग्रस्त भागात बंधारे बांधणे, जल आराखडा तयार करणे, नद्यांच्या पात्रांचे रुंदीकरण व खोलीकरण करून त्यांचे पुनरूज्जीवन करण्याची कामे संघ करणार असल्याचे संघाचे पश्चिम क्षेत्र सेवा प्रमुख डॉ. उपेंद्र कुलकर्णी यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत सांगितले. कुलकर्णी म्हणाले की, १२ जिल्ह्यांमध्ये सात कोटी रुपये खर्च करून विविध प्रकल्पांचे नियोजन केले आहे. शिवाय औरंगाबाद व जालना जिल्ह्यांतील दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या गावांचे सर्वेक्षण करून प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी तज्ज्ञ अभियंत्यांचा गट सक्रीय झाल्याचेही त्यांनी सांगितले.
दुष्काळग्रस्त भागात चाऱ्यांची समस्या मोठी गंभीर असल्याने पुढील १८० दिवस विविध ७० चार डेपोंच्या माध्यमातून पशूखाद्य पुरवणार असल्याचेही संघाने स्पष्ट केले. पिण्याच्या पाण्याच्या बचतीचे आणि संवर्धनाचे उपाय सांगणारे जनजागृतीपर उपक्रम राज्यातील ५०० गावांमध्ये राबवण्याचे कामही संघाचे स्वयंसेवक करणार आहेत. शिवाय दुष्काळग्रस्त भागांतील जे विद्यार्थी शहरात शिकतात, त्यांच्यासाठी पुढील सहा महिने भोजनाची सोयही संघ करणार असल्याचे सेवा विभागाने सांगितले.
No comments:
Post a Comment