नालेसफाईत गैरव्यवहार झाल्याचे उघड - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 December 2015

नालेसफाईत गैरव्यवहार झाल्याचे उघड


मुंबई - नालेसफाईतील गैरव्यवहारात महापालिकेचे 20 अधिकारी अडकण्याची शक्‍यता आहे. कंत्राटदारांनी गाळ वाहून नेणाऱ्या वाहनांचे "व्हेईकल ट्रेकिंग रेकॉर्ड‘ही महापालिकेला दिलेले नाही. अंतिम चौकशीत 70 टक्के नालेसफाईत गैरव्यवहार झाला असल्याचे उघड झाले आहे. 

जूनमधील पहिल्या पावसात मुंबई जलमय झाल्यानंतर आयुक्त अजोय मेहता यांनी नालेसफाईची चौकशी सुरू केली होती. उपायुक्त प्रकाश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काही निवडक नाल्यांच्या सफाईबाबत चौकशी करण्यात आली. त्यात गैरव्यवहार आढळल्यानंतर सर्व नाल्यांच्या सफाईबाबतच्या चौकशीसाठी अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांची समिती नेमली होती. समितीने आयुक्तांना अहवाल दिला आहे. या समितीने सुमारे 200 कोटींचा गैरव्यवहार झाल्यावर शिक्कामोर्तब केले आहे. हा अहवाल स्थायी समिती सदस्यांना दिला जाणार आहे.
या अहवालात महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या, दक्षता आदी विभागांतील तब्बल 20 अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला असल्याचे समजते. 70 टक्के नालेसफाईत गैरव्यवहार झाल्याचा निष्कर्षही काढण्यात आला आहे. गाळ वाहून नेणाऱ्या वाहनांवर व्हेईकल ट्रेकिंग सिस्टीम (व्हीटीएस) बसवण्यात आली होती; मात्र त्याविषयीचा अहवाल पालिका प्रशासनाला देण्यास कंत्राटदारांनी नकार दिला आहे. 

प्राथमिक चौकशीत गाळ वाहून नेणाऱ्या वाहनांच्या क्रमांकांविषयी परिवहन विभागाकडे महापालिकेने चौकशी केली असता ते क्रमांक दुचाकी, तसेच इतर लहान वाहनांचे असल्याचे आढळून आले होते. तसाच प्रकार अंतिम तपासणीतही आढळून आला आहे.
या प्रकरणातील दोषी कंत्राटदारांविरोधात महापालिकेने यापूर्वीच पोलिस तक्रार केली आहे. आता सर्व कंत्राटदारांविरोधात तक्रार दाखल करण्यात येणार आहे. पोलिस चौकशीसाठी पुरावे म्हणून हा चौकशी अहवालही सुपूर्द करण्यात येईल. कंत्राटदारांबरोबरच काही पालिका अधिकाऱ्यांचीही पोलिस चौकशी करण्याची शक्‍यता आहे.
या गैरव्यवहारामुळे शिवसेना चांगलीच अडचणीत आली आहे. मुंबईत पूरपरिस्थिती ओढावली असतानाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व नेते नालेसफाईबाबत समाधान व्यक्त करत होते. मात्र, प्रत्यक्षात सफाईच झाली नसल्याचे उघड झाल्याने या गाळात शिवसेनाही अडकण्याची शक्‍यता आहे. 100 टक्के नालेसफाईचा दावा केला जात होता; मात्र प्रत्यक्षात 30 टक्केच सफाई झाल्याचे उघड झाले आहे, असे मनसेचे गटनेते संदीप देशपांडे म्हणाले. नालेसफाईचे समर्थन करणाऱ्यांनी आता मुंबईला बुडवून दाखवले, असा चिमटा विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी काढला. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad