मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - 26 Dec 2015
संपत्तीची माहिती सीबीआयला देऊ अशी धमकी देत व्यावसायिकाकडे दोन कोटींची खंडणी मागणाऱ्या दोघा तरुणांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली. संतोष खानविलकर (वय १८) आणि प्रशांत पाईत (१८) अशी त्यांची नावे आहे. हे दोघे घाटकोपर परिसरात राहणारे आहेत.
घाटकोपर परिसरात तक्रारदार व्यावसायिकाचा बिल्डिंग मटेरियल आयात आणि वितरण करण्याचा व्यवसाय आहे. याच व्यवसायासंबंधी आॅक्टोबरमध्ये विक्रीकर विभागाने त्यांच्या घरी आणि कार्यालयात तपासणी सर्व्हे केला होता. ही माहिती त्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने आरोपींना सांगितली होती. त्यानुसार त्यांनी त्यांच्याबाबत अधिक माहिती मिळवून फोन आणि एसएमएस करून खंडणीसाठी धमकावत होते.रक्कम न दिल्यास तुमच्याबाबतची सर्व माहिती सीबीआयला कळवू, असे धमकावत त्यांच्याकडे दोन कोटींची मागणी केली. वारंवार धमक्या येत असल्याने व्यावसायिकाने याबाबत पोलिसांकडे तक्रार केली.
त्यानंतर खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक वस्त यांनी त्यांचा तपास सुरू केला. सदर आरोपी हे घाटकोपर परिसरातच राहत असल्याची माहिती त्यांना मिळाली. पथकाचे पोलीस निरीक्षक विनायक मेर, सचिन कदम, संजीव धुमाल, साहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, संतोष नाटकर, राजू सुर्वे, अरविंद पवार, धोंडीराम बनगर आदींनी सापळा रचत या आरोपींना अटक केली. पुढील कारवाईसाठी त्यांना पार्कसाइट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी दिली.
क्राइम पेट्रोल बघून कट रचला
मुख्य आरोपी संतोष खानविलकरला ‘क्राइम पेट्रोल’ ही मालिका बघण्याचा छंद आहे. त्यात दाखविल्या जाणाऱ्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवरून त्यांनी ही खंडणीची योजना आखली. त्यानुसार व्यावसायिकाची माहिती जमविल्यानंतर पोलीस पकडू नयेत, यासाठी त्याने जुना मोबाइल खरेदी केला. त्यानंतर घाटकोपर परिसरात रस्त्यावर मिळालेल्या एका सिमकार्डवरून त्याने व्यावसायिकाला फोन आणि एसएमएस केले होते. तसेच व्यावसायिकाच्या घरातील कुटुंबीयांचे फोटो फेसबुकवरून जमा केले. तसेच व्यावसायिकाला घाबरवण्यासाठी शस्त्रसाठा व काही अमली पदार्थांचे फोटो जमा करत एक पेन ड्राइव्हमध्ये लोड करून ते व्यावसायिकाच्या घरी पाठवले. या फोटोमुळे तो घाबरून आपल्याला खंडणी देईल, अशी त्यांना खात्री होती.
No comments:
Post a Comment