मुंबई - राष्ट्रीय दिवसांतून २८ नोव्हेंबर हा महात्मा फुले यांचा स्मृतिदिन आणि ६ डिसेंबर हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन वगळण्यामागे पुरोगामी विचारांच्या महापुरुषांची ओळख पुसण्याचा राज्य सरकारचा डाव असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली.
‘शासनाच्या राष्ट्रीय दिवसाच्या यादीतून महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांचा स्मृतिदिन रद्द करणे हे भाजपा -शिवसेना सरकारचे असहिष्णू वृत्तीचे द्योतक आहे. या पूर्वीच्या सरकारने या दोन्ही महापुरुषांच्या स्मृतिदिनाचा राष्ट्रीय दिवसांत समावेश केला असतानाही ते दोन्ही दिवस नवीन जीआरमध्ये नसणे हे सरकारने हेतूपूर्वक केले आहे. त्यामध्ये या सरकारची भूमिका स्पष्ट होते आहे’, अशी टीका राणेंनी केली.
सरकारला धारेवर धरणार : मुंडेमहापुरुषांची नावे ‘राष्ट्रीय दिवस’ यादीतून वगळणे चुकीचे आहे. याची किंमत फडणवीस सरकारला मोजावी लागेल. बिहार निवडणुकीदरम्यान सरसंघचालकांनी आरक्षणाबद्दल केलेले वक्तव्य भाजपाला भोवले होते. त्याची किंमत त्यांना निवडणुकीत चुकवावी लागली. तसेच राज्य सरकारने केलेल्या कृत्याची किंमतही त्यांना चुकवावी लागणार आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरणार आहोत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधान परिषदेचे विराेधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली.
No comments:
Post a Comment