मातंग समाजाला ८ टक्के आरक्षण मिळावे यासाठी अखिल भारतीय मातंग संघाच्या वतीने मुंबईच्या आझाद मैदानात बेमुदत उपोषण करण्यात आले. परंतू मातंग समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने येत्या १८ डिसेंबरला नागपूरच्या विधान भवनाला घेराव घालणार असल्याची माहिती बाबासाहेब गोपले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आझाद मैदानावर बेमुदत उपोषण आणि धरणे आंदोलन सुरु होते. त्यावेळी एकनाथ खडसे, विनोद तावडे, राजकुमार बडोले, दिलीप कांबळे, हे आझाद मैदानात आले होते. या मान्यवरांनी आंदोलनाच्या ठिकाणी भेट देवून आमची सत्ता आल्यास ८ टक्के आरक्षण देवू असे आश्वासन दिले होते. परंतू सध्या भाजपची सत्ता आली असली तरी अद्याप मातंग समाजाला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे ८ टक्के आरक्षण देता आलेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भेटून निवेदन दिले असता बैठक लावण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांनी शब्द देवूनही आपला शब्द पाळलेला नाही. यामुळे मातंग समाजामध्ये असंतोष पसरला असल्याचे गोपले यांनी सांगितले.
मातंग समाजाला ८ टक्के आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने बैठक घेतली नाही व केंद्र सरकारकडे शिफारस देखील केलेली नाही. अनुसूचित जातीमध्ये मातंग हा सर्वात मोठा घटक आहे. हा मोठा घटक आरक्षणापासून वंचित असल्याने मातंग समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक नुकसान होत आहे. मुंबई येथील विधान भवन इमारतीच्या बांधकामामध्येही मातंग समाजातील लोकांच्या जागा घेण्यात आल्या. त्यापैकी कित्तेकांना अद्याप पर्यायी घरे मिळालेली नाहीत. सरकाराने ८ आरक्षणाचा आणि विधान भवन बांधकामा मधील लोकांना पर्यायी जागा द्यावी अन्यथा येत्या १८ डिसेंबरला १२ संघटनांच्या वतीने नागपूर येथील विधान भवनला घेराव घालण्यात येईल असा इशारा बाबासाहेब गोपले आणि कुसुमताई गोपले यांनी दिला आहे. यावेळी त्यांच्या सोबत डी. बी. अडांगळे, संतोष पवार, विनायक सूर्यवंशी, गुलाब घाटोळे, मुकुंद वायदंडे, बाळासाहेब माने इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment