सीएसटी स्थानकात लोकलची बफरला धडक - गार्ड निलंबित - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 December 2015

सीएसटी स्थानकात लोकलची बफरला धडक - गार्ड निलंबित

मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - चर्चगेट स्थानकात लोकल बफरला धडकून अपघात झाल्याची घटना ताजी असताना अशाच घटनेची पुनरावृत्ती सोमवारी मध्यरात्री सीएसटी स्थानकात घडली. सीएसटी स्थानकात आलेली लोकल शंटिंग करताना मोटरमनऐवजी गार्डकडून चालविण्यात आली; आणि ही लोकल बफरला धडकली. डुलकी लागल्याने गार्डकडून ही घटना घडल्याचे रेल्वेतील सूत्रांकडून सांगण्यात आले. या घटनेनंतर रेल्वेकडून चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक चौकशी समिती स्थापन केली आहे. तसेच गार्डलाही निलंबित करण्यात आले. मोटरमननेही कामात हलगर्जीपणा दाखविल्यामुळे त्याचीही चौकशी केली जाणार असल्याचे रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या घटनेत गार्डही जखमी झाले आहेत. गार्डकडून ब्रेकही लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तो लागला नाही. तसेच ही ट्रेन जवळपास ताशी १0 ते १५ किमी एवढी वेगाने होती, असे सांगण्यात आले.

कसाराहून सीएसटीला येणारी शेवटची लोकल सोमवारी मध्यरात्री २.२५ च्या सुमारास सीएसटी स्थानकात पाच नंबर प्लॅटफॉर्मवर नेहमीप्रमाणे दाखल झाली. लोकल दाखल होताच त्यामध्ये असलेले काही मोजकेच प्रवासी उतरुन गेले आणि लोकल रिकामी झाली. लोकल दाखल झाल्यानंतर मोटरमन विजय खानविलकर आणि गार्ड संजीव नाईक यांनी लोकल शंटींग (लोकल मागे-पुढे करुन चाचणी करणे) करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मोटरमन आणि गार्डकडून आपल्या जागा अदलाबदली करण्यात आल्या. मोटरमन खानविलकर हे मस्जिद स्थानकाच्या दिशेने असलेल्या त्याच लोकलच्या मोटरमन केबिनमध्ये चढले. तर गार्ड नाईक हे सीएसटी अखेरीस असलेल्या शेवटच्या केबिनमध्ये बसले. मोटरमनकडून शंटीगचे काम करण्यात आल्यानंतर नियमानुसार दुसऱ्या बाजूने शंटीग करताना जागेची अदलाबदली करणे गरजेचे असते. मात्र, तसे न करता दुसऱ्यांदा शंटीग करण्यासाठी सीएसटी दिशेने असलेल्या गार्डने लोकल सुरु केली आणि ती चालविण्याचा प्रयत्न केला. लोकल थोडी मागे घेताच (मस्जिद दिशेने) ती पुन्हा पुढे नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या गार्डला अचानक डुलकी लागली आणि लोकल जावून बफरला धडकली. ही घटना घडताच मोठा आवाज झाला आणि या आवाजामुळे पोलिसांसह स्टेशन मास्तरची धावपळ उडाली. यात बफरची पूर्णपणे नासधूस झाली. घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मध्यरात्रीच घटनास्थळी भेट दिली आणि घसरलेले दोन डबे रुळावरुन हटविण्याबरोबरच त्याठिकाणी जमलेला ढिगारा बाजूला काढण्याच्या सूचना कामगारांना दिल्या. मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास काम पूर्ण केल्यानंतर या प्लॅटफॉर्मवरील लोकल सेवा पुर्ववत करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad