दाऊदच्या हॉटेलची ४.२८ कोटींमध्ये विक्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 December 2015

दाऊदच्या हॉटेलची ४.२८ कोटींमध्ये विक्री

मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईस्थित बारा मालमत्तांपैकी एक पाकमोडिया स्ट्रीट क्रमांक चारवरील हॉटेल रोनक अफरोजचा (नंतरचे दिल्ली जायका) बुधवारी अखेर लिलाव झाला. मुंबईतील निवृत्त पत्रकार एस. बालकृष्णन यांनी तब्बल ४ कोटी २८ लाखांची बोली लावून ही मालमत्ता खरेदी केली. आपल्या देशसेवा समितीच्या वतीने या जागी अशफाख उल्लाह खान यांच्या नावे गरीब मुलांसाठी संगणक प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा एस. बालकृष्णन यांचा मानस आहे. एकोणीसशे नव्वदच्या दशकात दाऊद इब्राहिमने भारताबाहेर पलायन केल्यानंतर त्याच्या राज्यभरातील मालमत्ता आयकर विभागाने सील केल्या होत्या. मुंबईत दाऊदच्या तब्बल बारा मालमत्ता आयकर विभागाच्या ताब्यात आहेत.

आर्थिक मदतीचे आवाहन
मुंबईतील अश्विन अँड कंपनी या सरकार मान्यताप्राप्त लिलाव कंपनीद्वारे मुंबईच्या हॉटेल डिप्लोमॅटमध्ये सकाळी अकरा वाजेपासून या मालमत्तेसाठी बोली सुरू झाली. बोलीत मुंबईतील दाऊदी बोहरा समाज ट्रस्ट व एस. बालकृष्णन यांची देशसेवा समिती सहभागी होती. या मालमत्तेची किमान किंमत १ कोटी १८ लाख रुपये ठेवली होती. दोन तास चाललेल्या या बोलीत दाऊदी बोहरा समाज ट्रस्टच्या वतीने ४ कोटी २७ लाखांपर्यंतची बोली लावली. त्यापेक्षा एक लाख रुपये जास्त बोली लावत बालकृष्णन यांनी ४ कोटी २८ लाखांत ही मालमत्ता विकत घेतली. एवढी रक्कम कशी उभी करणार असे विचारले असता, बालकृष्णन म्हणाले की, हे आमच्या संस्थेच्या आवाक्याबाहेरचे असल्याने या रक्कम उभारणीत देशवासीयांनी सढळ हस्ते मदत करावी.

येत्या तीस दिवसांत खरेदीदाराला रकमेचा भरणा करायचा आहे. या कालावधीत रकमेचा भरणा न झाल्यास अनामत रक्कम जप्त होऊन या मालमत्तेचा पुन्हा लिलाव होईल. रक्कम भरणा केल्यानंतर या मालमत्तेवर विविध विभागांची असलेली थकबाकी भरल्यानंतरच तिचा ताबा खरेदीदाराला मिळेल. ही लिलाव प्रक्रिया प्रत्यक्ष, ऑनलाइन बोली व मोहोरबंद निविदा अशा तीन पद्धतींनी पार पडली.













हिंदू महासभेने घेतली दाऊदची कार
अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेचा बुधवारी लिलाव झाला, त्यात हिंदू महासभाही सहभागी झाली होती. मात्र, या संघटनेचा सहभाग खरेदीसाठी होता की राजकीय प्रसिद्धी मिळवण्यासाठी होता, असा प्रश्न उपस्थित हाेत अाहे. कारण दाऊदच्या हाॅटेलसाठी बोली न लावता महासभेच्या प्रतिनिधींनी एका फुटकळ कारसाठी सर्वाधिक बोली लावून लिलावातून बाहेर जाणे पसंत केले. विशेष म्हणजे ती कार दाऊदचीच आहे याबद्दल अजून कोणतेही ठोस पुरावे नाहीत. हिंदू महासभेचे स्वामी चक्रपाणी यांनी मात्र ही कार अापण खरेदी केल्याचा दावा केला अाहे.

दाऊदच्या हाॅटेलसह आणखी सात मालमत्तांचा लिलाव बुधवारी झाला. यात गुजरातमधील चार भुखंड, मुंबईतील माटुंगा येथील एक सदनिका, हॉटेल रोनक अफरोज आणि एका ह्यंुदाई अॅसेंट कारचा समावेश होता. यापैकी हॉटेल रौनक अफरोज (दिल्ली जायका)वगळता इतर सहा मालमत्ता या दाऊदच्या अाहेत का याबद्दल कोणतेही पुरावे नाहीत. त्यामुळे ‘आपण खरेदी केलेली कार ही दाऊदचीच आहे का?’ याबद्दल विचारले असता हिंदू महासभेच्या महासचिव इंदिरा तिवारी म्हणाल्या की, या सातही मालमत्ता दाऊदच्याच आहेत, असे लिलाव करणाऱ्या कंपनीने सांिगतले होते. मात्र आता ही कार दाऊदची नाही अशी माहिती पुढे येत असल्याने आपली दिशाभूल केल्याचेही त्या म्हणाल्या.















हिंदू महासभेची स्टंटबाजी? : 
‘दाऊदची मालमत्ता खरेदी करण्याचा आपला हेतू होता. तर मग हॉटेल रौनक अफरोजसाठी बोली न लावताच आपण लिलावातून बाहेर का जात आहात?’ या प्रश्नावर समर्पक उत्तर देण्याऐवजी चक्रपाणी यांनी ‘दाऊदचे जनमानसातले भय कमी करण्यासाठी आम्ही या लिलावात सहभागी झालाे,’ एवढेच उत्तर दिले. त्यामुळे खरोखरच हिंदू महासभेला ही मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा होती की, निव्वळ प्रसिद्धी मिळवण्यासाठीचा हा स्टंट होता, अशी चर्चा रंगली होती.
दाऊदची कार हिंदू महासभेने ३२ हजारांना घेतल्याचे इंदिरा तिवारी म्हणाल्या, तर स्वामी चक्रपाणी यांनी मात्र ती कार ३ लाख २० हजारांना घेतल्याचे सांगितले. तसेच या कारचे आता काय करणार असे विचारले असता स्वामी चक्रपाणी म्हणाले की, ‘दुरुस्त होण्याजोगी असेल तर दुरुस्त करून एखाद्या सेवाभावी संस्थेला दान देऊ आणि नसेल तर दाऊदची निशाणी समजून जाळून टाकू.’

टप्प्याटप्प्याने १२ मालमत्तांचा लिलाव
- राजगारा मॅन्शन
- डांबरवाला बिल्डिंग
- पाकमोडिया स्ट्रीटवरील दोन व्यावसायिक गाळे
- याकुब रोडवरील दोन व्यावसायिक गाळे
- याच मार्गावरील २४ निवासी इमारती
- जयराजभाई लेन ताडदेव येथील तीन गाळे
- टेमकर स्ट्रीटवरील प्लॉट क्रमांक २२
- घासवाला बिल्डिंगमधील दोन सदनिका
- म्हाडा बिल्डिंग क्र. ४९
- नागपाड्यात गॉर्डन हॉल इमारतीतील सदनिका
- गरिब नवाज गेस्ट हाऊस व इस्माईल बिल्डिंग

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad