महापरिनिर्वाणदिनी सोयी सुविधांमधील त्रुटी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 December 2015

महापरिनिर्वाणदिनी सोयी सुविधांमधील त्रुटी

आपल्या देशात हजारो वर्षे जातीभेद पाळला जात होता. खालच्या शुद्र समजल्या जाणाऱ्या लोकांचा स्पर्श सोडा साधी अंगावर सावली पडली तरी त्यावेळच्या उच्च जातीतील लोकांना चालत नव्हते. अश्या आपल्या हक्कांपासून वंचित असलेल्या सर्वच शुद्र आणि अती शुद्र असलेल्या लोकांना माणूस म्हणून जगण्याचा आणि त्यांना त्यांचे अधिकार मिळवून देण्याचे महान असे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. बाबासाहेब आंबेडकर यांनी जी भारतीय राज्य घटना लिहिली त्यामध्येच अश्या सर्वच वंचित घटकांना त्यांनी समान अधिकार मिळवून दिले. यामुळे आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी (६ डिसेंबर) मुंबई दादर येथील चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरात देशाच्या कानाकोपऱ्यातून दर वर्षी ३० लाखांहून अधिक लोक बाबासाहेबांना अभिवादन करायला येत असतात.   

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाणदिन ६ डिसेंबर रोजी असला तरी चैत्यभूमीला १ डिसेंबर पासून लोक अभिवादन करण्यासाठी येत असतात. देशभरातून आलेली लोक ५,६ आणि ७ डिसेंबर या दिवशी ७ ते ८ तास रांगेत उभी राहून बाबासाहेबांना अभिवादन करत असतात. ५ डिसेंबर आणि  ६ डिसेंबरला या अभिवादनाच्या रांगा वरळी पर्यंत असतात. मुंबई मध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या ३० लाखांहून अधिक लोकांच्या तुलनेत स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून मुंबई महानगर पालिकेने केलेली व्यवस्था अतिशय कमी पडत असते. वर्षानुवर्षे चैत्यभूमीला अभिवादन करणाऱ्या भीम अनुयायांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढतच आहे. परंतू त्या प्रमाणात महानगरपालिकेच्या सोयी मात्र अपुऱ्या पडत असल्याने भीम अनुयायांचे दरवर्षी हाल होत असतात याकडे मात्र दुर्लक्ष होत असते. 

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार शिवाजी पार्क परिसराच्या दक्षिण बाजूला ५०,१५० चौरस फूट निवासी मंडप व उत्तरेला ३८,५१४ चौरस फूटांचा निवासी मंडप याप्रमाणे एकूण ८८,६६४ चौरस फूट क्षेत्रफळाचा निवासी मंडप उभारण्यात येतात. भंतेजीकरिता ७,६०० चौरस फूट क्षेत्रफळाचा मंडप व प्रार्थनेसाठी ४०० चौरस फूटांचा मंच उभारण्यात येतात. भंतेजीकरिता स्काऊट गाईड हॉल येथे १०० व्यक्तींच्या निवासाची व्यवस्था करण्यात येते. २००० चौरस फूट क्षेत्रफळामध्ये स्वागत कक्षवैद्यकीय सेवाअग्निशमन नियंत्रण कक्षनियोजन कक्ष इत्यादी व्यवस्था करण्यात येते. यावर्षी पहिल्यांदाच महानगरपालिकेने १८,४०० चौरस फूट क्षेत्रफळाचा भोजन मंडप उभारला होता. भ्रमणध्वनी (मोबाईल फोनचार्ज करता यावे यासाठी १०० ठिकाणी चार्जिंग पॉइंट निर्माण करण्यात आले होते. 

पिण्याच्या पाण्चाच्या व्यवस्थेसाठी २७० ठिकाणी नळांची व्यवस्था करण्यात आली होती. नळांव्यतिरीक्त दररोज १५ पाण्याच्या टँकर्सद्वारे देखील पिण्याच्या पाण्याची अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली होतीया प्रत्येक टँकरमध्ये १०,००० लिटर्स इतके पिण्याचे पाणी उपलब्ध असणार म्हणजेच दररोज १,५०,००० लिटर्स इतके पाणी दररोज अतिरिक्त स्वरुपात उपलब्ध करण्यात आले होते. चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरात १४ फिरती शौचालय (१४० शौचकुपे) उपलब्ध करून देण्यात आली होती. रांगेत असणा-या अनुयायांसाठी ९ फिरती शौचालये (९० शौचकुप), समुद्र किना-याजवळ ९४ स्नानगृहे व ७५ शौचालयांची व्यवस्था तसेच शिवाजी पार्क परिसरात स्त्री व पुरूषांसाठी एकूण ११० स्नानगृहे निर्माण करण्यात आली होती. १५ वाहने व १००० राखीव कामगारांसह संपूर्ण परिसरात स्वच्छता व्यवस्था नियोजन करण्यात होते. लोकांचा जमलेल्या गर्दीमुळे कित्तेक ठिकाणी कचरा निर्माण झाला तरी इतक्या मोठ्या संखेने असणाऱ्या पालिकेच्या कर्मचारी अधिकारी यांना म्हणावी तसी स्वच्छता ठेवता आलेली नाही.  

मुंबई महानगरपालिका महापरिनिर्वाण दिनासाठी १ डिसेंबर ते ७ डिसेंबर असा आठवडाभर अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या देशाच्या कानाकोपऱ्यातील भीम अनुयायांना फक्त ६ डिसेंबर या एकाच दिवशी सोयी सुविधा पुरवते. ३० लाखांहून अधिक जनसमुदाय महापरिनिर्वाण दिना निमित्त अभिवादन करायला येतात असे असताना २७० ठिकाणी नळ, १० हजार लिटर पाण्याचे १५ टँकर म्हणजेच ,५०,००० लिटर्स इतके पाणी पुरविले जाते. ३०५ शौचकुपे आणि २०४ स्नानगृहे उपलब्ध केली होती. शौचकुपे आणि स्नानगृहे हि बहुतेक चैत्यभूमीच्या मागील बाजूस समुद्र किनारी आणि शिवाजी पार्क परिसरात असतात. याचा म्हणावा असा रांगेमधील लोकांना उपयोग होत नाही. एखाद्या रांगेमधील कोणाला शौचास जायचे झाल्यास फक्त ९० शौचकुपे होती. त्यामध्ये आपला नंबर येई पर्यंत त्याची काय हालत होत असेल हे सांगायला नको. पुरुषांची अशी हालत असेल तर महिलांची काय परिस्थिती असेल याचा विचार न केलेलाच बरा. 

स्नानगृहे शिवाजी पार्क आणि चैत्यभूमीच्या मागील बाजूस असतात. चैत्यभूमी पासून लागलेली रांग वरळी पर्यंत असते. एखाद्याला स्नान करावयाची असल्यास किती तास आपला नंबर यायची वाट पहावयास लागत असेल. चैत्यभूमीच्या मागील बाजूस जायचे झाल्यास चैत्यभूमीसमोर अशोक स्तंभाकडून व्हीआयपी येत असल्याने हा रस्ता बंद असतो. इंदू मिलच्या बाजूने मागील जायचे झाल्यास त्याला चैत्यभूमिकडून येणाऱ्या लोकांच्या विरोधी दिशेने गर्दीचा सामना करत जावे लागते. ६ डिसेंबरला होणारी गर्दीचा अनुभव नसणाऱ्या पालिका आणि राज्य सरकारच्या एसी क्याबीन मध्ये बैठका घेणाऱ्या अधिकाऱ्यांना याची जाणीव नक्कीच नाही असे म्हणावे लागेल. अधिकारी, सत्ताधारी जे म्हणतात ते मान्य करणारे समन्वय समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही व्हीआयपी लोकांच्या बाजूने पिंगा घालत असल्याने. आंबेडकरी अनुयायांना सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी आणि दिलेली सुविधा योग्य आहे का हे पाहण्यासाठी म्हणावा तसा दबाव गटच कार्यरत नसल्याचे दिसत आहे. 

शिवाजी पार्क आणि चैत्यभूमी परिसरात एकूण ४६९ तात्पुरत्या स्टॉल्सची व्यवस्था करण्यात आली आहे. यापैकी ३८९ स्टॉल्स हे पुस्तककॅसेट्स सी.डी. /डी.व्ही.डीइत्यादी विक्री संबंधीचे तर ८० स्टॉल्स हे खाद्यपदार्थ विक्रीसाठीचे उपलब्ध करून देण्यात आले होते. या स्टॉल्सची जागा देण्यासाठी मुंबई महानगरपालिका भुईभाडे आणि स्वच्छता कर म्हणून प्रत्तेकी २५० रुपयांपर्यंत कर वसूल करते. आणि कर भरणाऱ्याला मंडप स्वता बांधून घेण्यास सांगते. यामध्ये मंडप बांधणारा हा पालिकेने नियुक्त केलेला अधिकृत कंत्राट दार असल्याचे सांगून अव्वाच्या सव्वा रक्कम वसूल केली जाते. काही स्टॉल्सच्या जागा तर व्हिआयपींच्या बाजूला पिंगा घालणारे पदाधिकारी ५ हजार रुपये घेवून देत असल्याची चर्चा आहे. पालिकेने असे प्रकार थांबवण्यासाठी भुईभाडे, स्वच्छता कर या बरोबर मंडपही बांधून दिल्यास पालिकेला महसूल मिळू शकतो आणि लोकांची फसवणूक सुद्धा होणार नाही. बेस्टकडून उपलब्ध करणाऱ्या विजेच्या कनेक्शन बाबतही वाटेल तशी रक्कम घेवून वीज कनेक्शन दिले जाते. यामुळे बेस्टला तोटा तर होईल परंतू अश्या कनेक्शनमुळे अपघात घडल्यास लाखो लोकांचा जीव जाऊ शकतो. याची नोंद घेण्याची गरज आहे. 

यावर्षी पहिल्यांदाच रस्त्यावर जेवणाचा कचरा पसरू नये म्हणून पालिकेने शिवाजी पार्कमध्ये १८,४०० चौरस फूट क्षेत्रफळाचा भोजन मंडप उभारला होता. लोकांनी जेवण घेवून या मंडपात बसून जेवण करावे असा याचा उद्देश होता. परंतू हा उद्देश म्हणावा तसा सफल झालेला नाही. या मंडपात फक्त शिवाजी पार्क मध्ये दुकानामध्ये खरेदी करणारे लोकच सहज येवू शकत होते. शिवाजी पार्क बाहेरील , चैत्यभूमी परिसर आणि रांगेमधील लोकांना याचा काहीही फायदा झालेला नाही. रांग सोडून किंवा चैत्यभूमी परिसरातून जेवण्यासाठी शिवाजी पार्क मधील भोजन कक्षात येणे आणि पुन्हा लाईनीमध्ये जाणे शक्य नाही. पाण्याची किंवा इतर व्यवस्थाही सिद्धीविनायक मंदिरा पर्यंत असते. आणि अभिवादनाच्या रांग वरळी पर्यंत असते ८ तास रांगेमध्ये उभ्या राहणाऱ्या लोकांची काय परिस्थिती असेल याचा पालिका आणि राज्य सरकारने विचार करायला हवा. 

महापरिनिर्वान दिनाची तयारी म्हणून बैठका लावण्यासाठी आणि बैठका झाल्यावर प्रशासनाने दिलेले गाजर घेवून येणारे पदाधिकारी यामुळे अशी व्यवस्था असते असे म्हणायला हरकत नाही. जर एखाद्या कार्यकर्त्याला किंवा बैठकांना हजार असलेल्या पदाधिकाऱ्याला भीम अनुयानाना मिळणारी सुविधा योग्य आहे का लोकांना काही त्रास होतों आहे का हे पहायची आठवण सुद्धा नुसते, इतके ते येणाऱ्या व्हीआयपींच्या स्वागतामध्ये आणि कसे व्हीआयपींच्या बाजूला फोटो आणि च्यानेल मध्ये दिसू यामध्ये गुंग असतात. आंबेडकरी अनुयायांना सोयी सुविधा योग्य मिळतात कि नाही ? कोणत्या सुविधा अपुऱ्या असतात? कोठे काही कमी राहिली का ? हे अश्या पदाधिकाऱ्याना पाहण्यास वेळ नसतो. यामुळे आता बैठका घेणारे व्हीआयपींच्या पुढ्यात पिंगा घालणारे पदाधिकारी नकोत असे म्हणण्याची पाळी आली आहे.  

महापरिनिर्वान दिनी मिळणाऱ्या सुविधामध्ये काही त्रुटी आहेत. ज्या सुविधा भीम अनुयायी मुंबईमध्ये अभिवादानासाठी येतात तेव्हा पासून परत जाई पर्यंत मिळायला हव्यात त्या सुविधा एक किंवा दोन दिवस मिळून्न उपयोग काय. या तत्रुटींचा अभ्यास करून भीम अनुयायांना चांगल्या सुविधा मिळवून देण्यासाठी आणि मिळणारी सुविधा योग्य आहे कि नाही यावर देखारेख ठेवणारी वेगळी यंत्रणा उभी करबी लागेल. आताच्या पदाधिकाऱ्यांकडून हे शक्य नसल्याने नव्या दमाच्या अभ्यासू लोकांना पुढे यावे लागेल. अन्यथा एसी क्याबीन आणि एसी सभागृहात थंड हवा खात महापरिनिर्वाण दिनाच्या बैठका आयोजित होत राहतील पदाधिकारी चहा बिस्कीट आणि नास्टा खाऊन खुश होतील. एसी क्याबीनमध्ये बसणारे अधिकारी पदाधिकारी इतक्या सुविधा देतो म्हणून आपली पाठ थोपटून घेतील. देशाच्या काना कोपऱ्यातून आलेला भीम अनुयायी मात्र जी सुविधा दिली जाते त्याची वाच्यता न करता बाबासाहेबांना अभिवादन करून परत जात राहील हे दिवस बदलण्याची गरज आहे. 

अजेयकुमार जाधव 
मो. ९९६९१९१३६३ 

PHOTO
Inline images 1
Inline images 4

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad