पालिकेच्या शिक्षण विभागातील गोंधळामुळे उर्दू माध्यमाच्या १९२ शिक्षण सेवकांचे भविष्य अंधारात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 December 2015

पालिकेच्या शिक्षण विभागातील गोंधळामुळे उर्दू माध्यमाच्या १९२ शिक्षण सेवकांचे भविष्य अंधारात

मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - 29 Dec 2015   
मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात सावळा गोंधळ सुरु असून अश्या कारभारामुळे मुंबई महानगरपालिकेच्या उर्दू माध्यमाच्या १९२ शिक्षण सेवकांचे भविष्य अंधारात लटकले आहे. या १९२ शिक्षक सेवकांना उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये त्वरित सामावून घ्यावे अशी मागणी समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांच्याकडे केली आहे. 

मुंबई महानगरपालिकेच्या उर्दू माध्यमाच्या शाळांसाठी शिक्षण सेवकांच्या भरतीसाठी १० जून २०१३ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यावेळी २० सप्टेंबर २०१३ मध्ये ४२८ उमेदवारांची यादी प्रसिद्ध करून त्यापैकी २१३ उमेदवारांना शिक्षण सेवक म्हणून पालिका शाळांमध्ये शिक्षण सेवक म्हणून रुजू करून घेण्यात आले. परंतू २०१३ नंतर बाकीच्या उमेदवारांना अद्याप शिक्षण सेवक म्हणून रुजू करून घेण्यात आलेले नव्हते. यामुळे उर्वरित १९२ शिक्षण सेवकांना नोकरीमध्ये सामावून न घेतल्याने त्यांचे भविष्य अंधारात आले होते. याबाबत समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी सातत्याने पाठपुरावा करून उर्वरित १९२ शिक्षण सेवकांना रिक्त पदावर रुजू करून घ्यावे अशी मागणी अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे आणि शिक्षण अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत केली. यावेळी शेख यांनी उपआयुक्त शिक्षण रमेश पवार यांनी या उमेदवारांना ऑगस्ट २०१५ पर्यंत या पदावर सामावून घेण्याचे आदेश दिले असल्याचे निदर्शनास आणून दिले. 

माहिती अधिकारात मिळालेल्या माहिती नुसार मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये २०१२-१३ मध्ये २०८ उर्दू शाळांमध्ये १०२७२६ विद्यार्थी तर २८४२ शिक्षक होते. सन २०१३-१४ मध्ये २०६ उर्दू शाळांमध्ये ९७८८९३ विद्यार्थी आणि २६९० शिक्षक होते. तर सन २०१४-१५ मध्ये २०५ उर्दू शाळांमध्ये ९७३३३६ विद्यार्थी आणि २६९८ शिक्षक आहेत. आरटीई कायद्यानुसार ३० विद्यार्थ्यांना एक शिक्षक असा नियम आहे. आरटीई कायद्या नुसार पालिकेच्या उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांच्या संखेच्या तुलनेत शिक्षकांची ५५० पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. हि रिक्त पदे त्वरित भरताना २०१३च्या भरती प्रक्रियेतील उर्वरित १९२ शिक्षक सेवकांना त्वरित सामावून घ्यावे अशी मागणी रईस शेख यांनी केली आहे. उर्दू शाळांमधील रिक्त पदे भरताना १९२ शिक्षक सेवकांना सामावून घेण्यासाठी लवकरच कारवाई करण्याचे आश्वासन पल्लवी दराडे आणि शिक्षण अधिकारी यांनी दिले असल्याची माहिती शेख यांनी दिली.   

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad