मुंबई महापालिकेतील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना वितरीत केलेले टॅब हे व्हीडिओकॉन कंपनी बनवत नाही. ज्या कंपनीने हे टॅब खरेदी केले आहेत, त्या टेक्नो इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीनेही आपण मुंबई महापालिकेला टॅबचा पुरवठा केला नसल्याचे म्हटले आहे.
मात्र, तरीही या कंपनीच्या नावाने बोगस चलन बनवून या टॅबचे वितरण झाल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी महापालिका सभेत मंगळवारी केला. त्यामुळे नालेसफाई आणि रस्ते कंत्राटाप्रमाणे टॅब खरेदीतही मोठा भ्रष्टाचार झाला असून त्याच्या चौकशीची मागणी त्यांनी केली. परंतु टॅबचा भ्रष्टाचार उघड होण्याच्या भीतीने सत्ताधारी पक्षाने यावर अधिक चर्चा करण्याचे टाळत प्रशासनालाही त्याचे उत्तर मांडण्यास दिले नाही.
मुंबई महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने महापालिका शाळांतील इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांना ‘टॅब’ देण्याचा निर्णय घेण्यात आला. ९ सप्टेंबरपासून याचे वितरण मुलांना करण्यात आले. एकूण २२ हजार ७९९ विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी हे टॅब खरेदी केले होते. परंतु प्रत्यक्षात व्हीडिओकॉन कंपनी ही बोल्ड मॉडेलचे टॅब बनवतच नसल्याचे आपल्या समजले आहे.
महापालिकेला या टॅबमध्ये क्लीनबोल्ड करण्यात आल्याचा आरोप डॉ. सईदा खान यांनी ६६ (ब)अन्वये सभागृहातील चर्चेत केला. खान म्हणाल्या की, महापालिकेने ३ हजार ८०० रुपयांना जे टॅब खरेदी केले आहेत, ते बाजारात २ हजार ५०० रुपयांना मिळत आहे. महापालिकेला पुरवठा करणारी टेक्नो इलेक्ट्रॉनिक्स ही कंपनी उत्तराखंडमधील असून त्यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आपण महापालिकेला कोणत्याही टॅबचे वितरण केले नसल्याचे सांगितले. जे टॅब दिले आहेत, त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड आहे, तसेच त्यांची बॅटरी दोन तासांपेक्षाही अधिक चालत नाही. त्यामुळे या टॅब खरेदीत मोठा भ्रष्टाचार असून याची चौकशी करण्याची मागणी खान यांनी केली.
No comments:
Post a Comment