मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - 20 Dec 2015
देवनार डम्पिंगवरील कच-याची विल्हेवाट शास्त्रोक्त प्रक्रियेन करण्यासाठी नेमलेल्या कंत्राटदाराचे कंत्राट रद्द केल्यानंतर येथील विल्हेवाट आता पालिकेतर्फे करण्यात येणार आहे. यासाठी महापालिका पोकलेन, डंपर आठ मोबाईल हायमास्ट सेवा भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहे. पोकलेन मशिनसाठी वर्षाला ३ कोटी ६२ लाख तर डंपरकरता वर्षाला २ कोटी ५० लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. याशिवाय मोबाईल हायमास्ट सेवांकरता ७५ लाख रुपये खर्च केला जाणार आहे. त्यामुळे सुमारे सात लाखांचा खर्च आता वर्षाला केला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी आला आहे.
देवनार डम्पिंगवर दरदिवशी विविध भागांतील ३५०० ते ४००० मेट्रिक टन कच-याची विल्हेवाट लावली जाते. कच-याची शास्त्रोक्तपणे प्रक्रिया करण्यासाठी २००९मध्ये ‘तत्त्व ग्लोबल’ कंपनीला कंत्राट दिले होते. या कंपनीने दरदिवशी येथे टाकण्यात येणा-या दोन हजार मेट्रिक टन क्षमतेचे खत निर्मिती प्रकल्प उभारणे बंधनकारक होते. परंतु या कंपनीने या खतनिर्मिती प्रकल्पाची उभारणी न केल्याने अखेर ८ सप्टेंबर २०१५ रोजी त्यांचे कंत्राट रद्द करण्याची नोटीस बजावली होती. त्यानंतरही त्यांनी याचे उत्तर न दिल्याने अखेर याबाबत स्थायी समितीचा ठराव आणि कंत्राट रद्द करण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
‘तत्त्व ग्लोबल’ या खासगी कंपनीला दिलेले कंत्राट रद्द झाल्याने देवनार डम्पिंगवर दररोज येणा-या कच-याची विल्हेवाट लावण्याचे काम पालिकेने हाती घेण्याचे ठरवले आहे. त्यामुळे देवनार डम्पिंग येथे नवीन लूप बनवण्यासाठी, रस्ता रुंदीकरण व येणा-या कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी मोठय़ा क्षमतेच्या पोकलेन मशीन वापरण्यात येणार आहेत. अतिरिक्त पोकलेन मशिनचा वापर करून कच-याच्या उंच ढिगा-यांचे स्थानांतरण, कचरा सपाटीकरण करण्यात येणार आहे. यासाठी दररोज एकूण १२ पोकलेन मशिनची आवश्यकता आहे. आधीच्या कंत्राटदाराने मागील काही वर्षात कोणतेही काम न केल्याने कच-याचे ढीग निर्माण झाले आहेत. हा कचरा हलवून सपाटीकरणाचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात येणार आहे. या पोकलेन मशिनसह डंपरचीही सेवा भाडेतत्त्वावर घेतली जाणार आहे.
देवनार डम्पिंगवरील मुख्य रस्त्यावर १२ हायमास्ट असून त्यापैकी ९ हायमास्टच्या केबल्सची समाजकंटकांनी नासधूस केली आहे. त्यामुळे येथील कचरा भराव भूमीवर सध्या केवळ तीन हायमास्ट कार्यरत आहेत. हायमास्टची नासधूस समाजकंटकांकडून झाल्याने यापूर्वीच्या कंत्राटदाराने ‘मोबाईल हायमास्ट’चा वापर केला होता. त्यामुळे महापालिकेने जुने हायमास्ट सुरू करण्याऐवजी ०८ मोबाईल ‘हायमास्ट’ची सेवा भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत.
No comments:
Post a Comment