विमानतळांवर सतर्कतेचा इशारा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 December 2015

विमानतळांवर सतर्कतेचा इशारा

मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - 27 Dec 2015   
इस्लामिक स्टेट ऑफ इराक ऍण्ड सीरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेच्या कारवायांत सामील होण्यासाठी निघालेल्या तेलंगणमधील तीन तरुणांना नागपूर विमानतळावर अटक केल्यानंतर राज्यातील सर्व विमानतळांवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विमानतळांवर दहशतवादविरोधी पथकासह (एटीएस) प्रमुख सुरक्षा यंत्रणांची पाळत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून बेपत्ता झालेल्या, तसेच इसिसमध्ये सामील होण्यासाठी जाण्याची दाट शक्‍यता असलेल्या तरुणांची माहिती या विमानतळांवर लावली जाईल. 


इसिसमध्ये जाण्यासाठी निघालेल्या सुशिक्षित घरांतील अनेक तरुणांना देशातील वेगवेगळ्या विमानतळांवर काही महिन्यांत पकडण्यात आले आहे. यापूर्वी मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई अशा प्रमुख विमानतळांवरून दुबईमार्गे इराक आणि सीरियात जाण्याचा प्रयत्न काही जणांनी केला होता. सुरक्षा यंत्रणांनी करडी नजर ठेवल्यामुळे अशा अनेक तरुणांना विमानतळांवरच पकडण्यात आले. प्रमुख विमानतळांवर वाढवलेला बंदोबस्त ध्यानात घेऊन इसिसमध्ये सामील होण्यासाठी निघालेल्या तरुणांनी आता देशातील "टू टायर‘ शहरांतील विमानतळांचा वापर आरंभला आहे.
मूळच्या हैदराबाद येथील अफशा जबीन या तरुणीला सप्टेंबरमध्ये तेथील विमानतळावर अटक झाली होती. अनेक वर्षे दुबईत राहिलेल्या या तरुणीने इंटरनेटवरून अल्पसंख्याक तरुणांची माथी भडकावून त्यांना इसिसमध्ये सहभागी होण्यास प्रवृत्त केल्याचे उघडकीला आले होते. मुंबईसह देशाच्या प्रमुख शहरातील तरुण तिच्या संपर्कात असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे इसिसबद्दल सहानुभूती असलेल्या तरुणांची संख्या मोठी असल्याचेही सांगण्यात येते.
नागपूर विमानतळावर पोलिसांनी पकडलेले तिघे जण विमानाने श्रीनगरला जाणार होते. त्यापूर्वीच एटीएसने त्यांना अटक केली होती. त्यातील दोघांनी यापूर्वी इसिसमध्ये सामील होण्यासाठी देशाबाहेर जाण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात उघड झाले. याचे गांभीर्य लक्षात घेऊन एटीएसने राज्यातील नागपूर, औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, नाशिक या विमानतळांवर बारकाईने लक्ष ठेवायला सुरुवात केली आहे.
कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश या शेजारी राज्यांतील रस्ता चुकलेले काही तरुण महाराष्ट्रातील विमानतळांचा वापर करण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळेच सुरक्षा यंत्रणा या विमानतळांवर तैनात असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची (सीआयएसएफ) मदत घेत आहेत. अचानक बेपत्ता झालेल्या तसेच इसिसमध्ये सामील होण्याची दाट शक्‍यता असलेल्या तरुणांची नावे या विमानतळांना कळवली जाणार आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad