मुंबईतील पाणी समस्सेवर पालिका गंभीर नाही -- विहिरी, तलावातील गाळ काढण्यासाठी निधीची तरतूद नाही - देवेंद्र आंबेरकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 December 2015

मुंबईतील पाणी समस्सेवर पालिका गंभीर नाही -- विहिरी, तलावातील गाळ काढण्यासाठी निधीची तरतूद नाही - देवेंद्र आंबेरकर

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पाऊस कमी पडल्याने तलावांमध्ये पाण्याची पातळी खालावत चालली आहे. येणाऱ्या उन्हाळ्याच्या एप्रिल मे महिन्यात हि परिस्थिती आणखी बिकट होणार आहे. मुंबईमध्ये पाण्याची स्थिती बिकट होत चालली असताना मुंबई महानगरपालिका मात्र म्हणावे तसे प्रयत्न करत नसल्याचे सांगत पालिका पाण्याच्या समस्येवर गंभीर नसल्याचा आरोप पालिकेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र आंबेरकर यांनी लावला आहे. 

मुंबईमध्ये अशीच पाण्याची बिकट स्थिती २००९ साली उत्पन्न झाली होती. त्यावेळी पालिकेने ८३ कोटी रुपयांची तरतूद करून विहिरी व तलावांमधील गाळ काढण्याची प्रक्रिया राबविली होती. सन २००९ मध्ये ज्याप्रमाणे ८३ कोटी रुपयांची तरतूद केली असली तरी तितका निधी खर्चच केला नाही. सन २००९ साली ज्याप्रमाणे निधीची तरतूद केली तशी तरतूद पालिकेने यावर्षी केली नसल्याची माहिती देवेंद्र आंबेरकर यांनी दिली. मुंबईमध्ये खाजगी, राज्य सरकार आणि पालिकेच्या एकूण १४७५८ विहिरी आहेत. पालिकेच्या ताब्यातील ५२२ विहिरी पैकी ३६३ उघड्या, ६३ बोअर वेल, ४१ रिंग वेल आहेत. त्यापैकी फक्त ५५ विहिरी या हार्मेटीकल सिमेंटच्या झाकणाद्वारे बंद आहेत. या ५५ विहिरी डास प्रतिबंधक आहेत. 

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ८ लाख ९२ हजार दशलक्ष पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा मुंबईकर नागरिकांना वर्षभर पुरेल इतका नसल्याने पालिकेने २० टक्के पाणी कपात लागू केली आहे. एप्रिल मे महिन्यात पाण्याची समस्या आणखी बिकट होणार आहे. यासाठी महापालिकेने मुंबईमधील विहिरी आणि मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील गाळ काढून पाण्याची पातळी वाढवावी, गाळ काढण्याची प्रक्रिया करण्यासाठी यावर्षी पालिकेने कोणतीही आर्थिक तरतूद केलेली नाही. गाळ काढण्यासाठी पाणी समस्या बिकट होण्या आधीच पालिकेने निधीची तरतूद करून मुंबईकर नागरिकाना दिलासा द्यावा अशी मागणी आंबेरकर यांनी केली आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad