मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - दि. १० डिसेंबर (प्रतिनिधी ) – वांद्रे परिसरात हवेचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याची बाब समोर आली आहे, याबाबत सरकार काय उपयोजना करणार असा प्रश्न आमदार अॅड. आशिष शेलार यांनी विधानसभेत विचारला. त्याला उत्तर देताना पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी वाहतूक कोंडीमुळे वांद्र्यात प्रदूषण होत असून वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलिसांच्या संख्येत वाढ करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.
मुंबई शहरातील हवेच्या प्रदुषणाचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिकांना फुफुसांचा कॅन्सर तसेच श्वसन नालीकेचे आजार होण्याच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. प्रदुषणाचे प्रमुख कारण हे वाहनांची वाढती संख्याअसून त्यावर नियंत्रण आणण्याबाबत भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. या चर्चेत सहभागी होताना आमदार आशिष शेलार म्हणाले की, जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार मुंबईतील प्रदुषणाचे प्रमाण १३६ मायक्रो ग्राम एवढ्या प्रमाणात वाढले आहे. हवेचा दर्जा १२ टक्क्यांपेक्षा जास्त घसरला आहे. मुंबईत रोज लाखो वाहनांची नव्याने नोंद होत आहे. अशावेळी प्रदुषणापासून मुंबईला रोखण्यासाठी नव्या वाहनांवर प्रदुषणासाठी स्वतंत्र कर लावणार का ? असा प्रश्न आमदार शेलार यांनी विचारला त्याला उत्तर देताना रामदास कदम यांनी सांगितले की, मुंबईत रोज ५० लाख वाहने येतात. मुंबईत येणा-या वाहनांची प्रदुषणाच्या दृष्टीने तपासणी करण्यात येत असून गेल्या ७ महिन्यांत २ लाख २६ हजार वाहनांची तपासणी करण्यात आली, त्यामध्ये ३५०० वाहने दोषी आढळली त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. यापुढेही वाहनांपासून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी परिवहन खात्यामार्फत सेल स्थापन करून मोठ्याप्रमाणात तपासणी करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. त्याचवेळी उपप्रश्न विचारून आमदार आशिष शेलार यांनी जून २०१५ ते डिसेंबर २०१५ च्या हवा गुणवत्ता अहवालानुसार वांद्रे येथील हवेची गुणवत्ता अंशत: खराब या प्रवर्गामध्ये मोडते असे दिसून आले आहे, याबाबात काय उपयोजना करणार अशी विचारणा केली. त्याला उत्तर देताना पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितले की, वांद्रे येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने प्रदूषणात वाढ झाली असून वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलिसांच्या संख्येत वाढ करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. या लक्षवेधीच्या चर्चेत भाजपा आमदार राज पुरोहित, अमित साटम आदि सहभागी झाले.
No comments:
Post a Comment