मुंबई / अजेयकुमार जाधव
भारतीय संविधानाचे जनक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ५९् महापरिनिर्वाण दिनानिमित्त (५ आणि ६ डिसेंबर) बेस्ट उपक्रम दादर येथील चैत्यभूमीवर येणार्या जनसमुदायाकरिता विविध सेवा-सुविधा पुरविण्यासाठी सज्ज झाला आहे अशी माहिती बेस्टचे अध्यक्ष अरविंद दुधवडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बेस्टचे महाव्यवस्थापक जगदीश पाटील आणि बेस्ट समिती सदस्य पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क, दादर चौपाटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान राजगृह, आंबेडकर कॉलेज या ठिकाणी २३५ अतिरिक्त मार्गप्रकाश दिवे बसवण्यात आले आहेत. वीजपुरवठा अखंडित ठेवण्याकरिता ५00 के.व्ही.ए. क्षमतेचे १ जनरेटर क्याडल रोड येथे तर रस्त्यावरील दिव्यांसाठी ५० के.व्ही.ए. क्षमतेचे १ जनरेटर चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क मैदानावर ठेवण्यात आले आहेत. मार्गप्रकाश दिव्यांच्या देखभालीकरिता एरियल लिफ्ट आणि वॉकीटॉकीने सुसज्य अशी ३ पथके शिवाजी पार्क, चैत्यभूमी, वनिता समाज येथे तैनात करण्यात आली आहेत. दादर चौपाटी, महापौर निवास आणि ज्ञानेश्वर निवास या ठिकाणी सर्च लाईट बसवण्यात आल्या असल्याचे दुधवडकर यांनी सांगितले.
चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क मैदान परिसरातील महानगरपालिकेने परवानगी दिलेल्या विविध संस्थांच्या मंडपांना तात्पुरती मीटर जोडणी धर्मादाय वीजदराने देण्याकरिता शिवाजी पार्क मैदानात एक खिडकी योजना उभारण्यात आली आहे.५डिसेंबर शनिवारच्या मध्यरात्रीपासून ६ डिसेंबर पर्यंत बसेसची सोय करण्यात आली आहे. शिवाजी पार्क बसचौकी आणि शिवाजी पार्क येथील तंबूमध्ये वाहतूक माहिती केंद्र उघडण्यात आले आहे. ५ आणि ६ डिसेंबर रोजी शहर विभागासाठीचा ४० रुपयाचा, उपनगरांसाठीचा ५० रुपयाचा तसेच संपूर्ण शहरासाठी असलेला ७0 रुपयांचा म्याजीक पास दैनंदिन बसपास शिवाजी पार्क बस चौकी तसेच शिवाजी पार्क मैदानावरील बेस्टच्या बूथ मध्ये उपलब्ध करण्यात असणार आहे. हे विशेष तिकीट असल्यामुळे त्याकरिता ओळखपत्राची आवश्यकता नाही अशी माहिती दुधवडकर यांनी सांगितले.
बेस्ट उपक्रमातर्फे भीम अनुयायांकरिता प्रथमोपचार केंद्र व वैद्यकीय मदत केंद्राची देखील उभारणी करण्यात आली आहे. त्याद्वारे १५०० लोकांवर उपचार करण्यात येणार आहेत. १५०० गरजू व्यक्तींची मोफत डोळ्यांची तपासणी करण्यात येणार असून आवश्यक असल्यास १००० लोकांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहे. तसेच भीम अनुयायाना अल्पोपाहार आणि पाणीवाटप करण्यात येणार आहे. दरवर्षी प्रमाणे बेस्ट उपक्रमातर्फे ६ डिसेंबरसाठी खास १0 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आल्याचे दुधवडकर यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment