मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - दि. 15 डिसेंबर –
ब्रेन स्ट्रोक (पक्षाघात) झाल्याने मेंदूत रक्ताची गुठळी किंवा रक्तस्रव झाल्यामुळे शरीरावर परिणाम होऊन यात रुग्णाचा मृत्यू होण्याचीही दाट शक्यता असते. मात्र, वेळेवर उपचार झाल्यास रुग्ण बरा होऊ शकतो. पक्षाघात झालेल्या रुग्णाला तातडीने उपचार मिळावेत, याकरिता मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयापाठोपाठ आता शीव रुग्णालयातही ‘ब्रेन स्ट्रोक’ हा स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला आहे. नायर रुग्णालयात संबंधित विभागाचे काम प्रगतीपथावर असून येत्या १ जानेवारीपासून हा विभाग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
वैद्यकीय उपचारांअभावी मुंबईत मेंदूच्या विकारांचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. पाच महिलांमागे एक महिला व पाच पुरुषांमागे एक पुरुष पक्षाघाताचा बळी ठरतो. त्यामुळे रुग्णालयात पक्षाघाताच्या रुग्णांवर तात्काळ उपचार व्हावेत यासाठी केईएमनंतर शीव रुग्णालयात पक्षाघातासाठी विभाग सुरू करण्यात आला आहे. या विभागांतर्गत रुग्णाचे सिटी स्कॅन करणे, मेंदूत रक्ताची गुठळी असल्यास इंजेक्शन दिले जाते. या इंजेक्शनची किंमत ३९ हजार रुपये इतकी आहे. यामुळे रुग्ण पटकन बरा होतो. मात्र, मेंदूत रक्तस्रव झाल्यास हे इंजेक्शन देता येत नाही. त्यासाठी शस्त्रक्रिया हाच पर्याय असतो. दरम्यान, या ब्रेन स्ट्रोक युनिटसाठी औषध विभाग, मेंदूविकार व क्ष-किरण अशा विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम हे काम करत आहे. केईएम रुग्णालयात दिवसाला तीन-चार रुग्ण उपचारांसाठी येतात हे लक्षात घेऊन प्रथम या रुग्णालयात हे युनिट सुरू करण्यात आले होते. या विभागात संबंधित रुग्णांसाठी दहा खाटा आरक्षित ठेवल्या आहेत. आता शीव रुग्णालयातही ‘ब्रेन स्ट्रोक युनिट’ सुरू करण्यात आले आहे. पक्षाघाताच्या रुग्णावर त्वरित उपचार व्हावेत याकरिता बाह्यरुग्ण विभाग कामाला लागला आहे.
No comments:
Post a Comment