महापालिकेची आर्थिक फसवणूक झाल्याचे उघड़
दोषी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करून नुकसानीची वसूली करा - आमदार अॅड आशिष शेलार
मुंबई, दि. ४ - मुंबईतील नालेसफाईच्या कामाची चौकशी व्हावी अशी आग्रही मागणी भाजपाने केली आणि अखेर यातील सत्य समोर आले असून पालिका आयुक्तांनी नाल्यांच्या कामांत ७० टक्के गैरप्रकार असल्याचे सांगत आपला अहवाल स्थायी समितीला सादर केला आहे. या अहवालामध्ये महापालिकेची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाल्याची गंभीर बाब उघड झाल्यामुळे या प्रकरणातील दोषी अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी. महापालिकेच्या झालेल्या नुकसानीची भरपाई संबंधीतांकडून करण्यात यावी. अशी मागणी आमदार अॅड आशिष शेलार यांनी केली आहे.
मुंबईत पावसाळा सुरू होताच दरवर्षी नालेसफाईचा विषय चर्चेत येतो. यावर्षी पावसाळा सुरू होण्यापुर्वीच सर्वात प्रथम आमदार अॅड आशिष शेलार यांनी मुंबईच्या दोन्ही उपनगरातील नालेसफाईची पाहणी करून कामात अनियमिता असल्याची शंका उपस्थित केली. त्यानंतर त्यांनी पालिका आयुक्त अजोय महेता यांची भेट घेऊन चौकशीची मागणी केली. तर विधानसभेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात या विषयावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनीही महापालिका आयुक्तांच्या निगराणीत या विषयाची चौकशी व्हावी असे निर्देश दिले होते. त्यानुसार आयुक्तांनी चौकशी समिती गठीत करून त्याचा सविस्तर अहवाल गुरूवारी स्थायी समितीला सादर केला आहे.
या अहवालामध्ये अत्यंत गंभीर बाबी चौकशी समितीने उघड केल्या असून सकृत दर्शनी महापालिकेची आर्थिक फसवणूक कंत्राटदारांकडून झाल्याचे दिसून आल्याचे म्हटले आहे. ३२ कंत्राटांपैकी गाळ वाहून नेणाऱ्या वाहनांच्या ५७,५६१ वाहन फेऱ्यांसाठी वापरण्यात आलेल्या सुमारे २३,८०० लॉगशीटमधील नोंदींसोबत जोडलेल्या व्हीटीएस प्रपत्रातील माहिती आणि वजनकाटा पावतीच्या नोंदी संगणकामध्ये नोंदवण्यात आल्या. या मध्ये ही फसवणूक झाल्याचे या समितीला दिसून आले आहे. गाळ वाहून नेण्यासाठी वापरण्यात आलेल्या वाहन फेऱ्यांमध्ये महापालिकेची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाला असून कंत्राटातील अटींचाही भंग झाल्याचे समितीला दिसून आले आहे. तसेच गाळ ज्यावजन काट्यावर मोजला त्या पावत्या कंत्राटदार सादर करू शकलेले नाहीत. एकाच लॉगशीटवर एकापेक्षा अधिक फेऱ्या दर्शनवण्यात आल्या आहेत अशा असंख्य गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. या चौकशीमध्ये गाळ वाहून नेणाऱया वाहनांच्या ७० टक्के फेऱया बोगस दाखविण्यात आल्या असून गाळ कुठे टाकला, गाळाचे मोजमाप याबाबत संपूर्ण घोळ असल्याचे उघड झाले आहे. यामध्ये मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे सत्य आता समोर आले आहे.
दरम्यान, आयुक्तांनी या विषयाची संपुर्ण चौकशी करून सत्य जनतेसमोर उघड केल्याबद्दल आमदार अॅड आशिष शेलार यांनी आयुक्तांचे आभार मानले असून दोषींवर कारवाई करण्याची आग्रही भूमिका घेतली आहे. तसेच याचौकशी समितीने सुचवलेल्या उपाययोजनांचा विचार करून नव्याने कंत्राटपद्धती अवलंबवावी अशी भूमिकाही आमदार अॅड आशिष शेलार यांनी मांडली आहे.
No comments:
Post a Comment