मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - दि. ११ डिसेंबर –
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफीसह जी मदत द्यायची असेल ती आधी जाहीर करावी, त्यानंतरच दुष्काळाच्या मुद्यावर चर्चा करावी, अशी ठाम भूमिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज पुन्हा विधान परिषदेत घेतली. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांना 1 रुपयाचे सानुग्रह अनुदान देण्यात येते, ही शेतकऱ्यांची घोर थट्टा आहे, अशा शब्दात त्यांनी शासनानं दिलेल्या लेखी उत्तराचा खरपूस समाचार घेतला.
विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला मराठवाड्यातील लातूर, बीड, उस्मानाबाद, परभणी जिल्हा तसेच विदर्भातील दुष्काळी परिस्थितीबाबत मुंडे यांनी प्रश्न विचारला होता. त्यावरील लेखी उत्तरात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना 1 रुपया मदत देण्यात येते, असं उत्तर शासनाच्या वतीनं देण्यात आलं. त्याबद्दल संताप व्यक्त करुन श्री. मुंडे यांनी शासनाच्या संवेदनशून्य, निद्रीस्तावस्थेवर चौफेर हल्ला चढवला. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांची ही घोर थट्टा आहे, असं त्यांनी सांगितलं.
मुंडे म्हणाले, की. भाजप-शिवसेना युतीच्या कारकिर्दीत तीन अधिवेशने झाली. या तिन्ही अधिवेशनांमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाली, परंतु शेतकऱ्यांना कवडीची मिळाली नाही, यंदा दुबार पेरणीसाठी हेक्टरी 1500 रुपयांची मदत जाहीर झाली, परंतु एकाही शेतकऱ्याला रुपया मिळाला नाही. एका जरी शेतकऱ्याला मदत मिळाली, असेल तर दाखवावी, असे जाहीर आव्हानही त्यांनी दिले.
राज्य सरकारनं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं कर्जमाफी द्यावी व मदत जाहीर करावी, अशी मागणी करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आजही विधान परिषदेत आक्रमक भूमिका घेतली. दुष्काळग्रस्तांना मदत जाहीर झाल्याशिवाय सभागृहाचे कामकाज पुढे सुरु ठेवणं, दुष्काळग्रस्तांची फसवणूक ठरेल, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे सभागृहाचे कामकाज आजही तहकूब करण्यात आले.
No comments:
Post a Comment