बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचाऱयांच्या सुख-दुःखात आर्थिकदृष्ट्या त्यांच्या पाठीशी राहणाऱया आणि उत्कृष्ट आर्थिक धोरणे व नियोजनामुळे प्रगती करीत असलेल्या ‘दि म्युनिसिपल को-ऑप. बँक लि., मुंबई’ ला सन २०१४ – २०१५ या आर्थिक वर्षातील कामगिरीसाठी एकाचवेळी चार पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी सभासद असलेल्या दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबई या बँकेस बँकींग क्षेत्रातील ‘बँकींग फ्रंटिअर्स’ या ख्यातनाम प्रकाशनातर्फे देण्यात येणारा पगारदार नोकरांच्या गटातील ‘‘सर्वोत्कृष्ट पर्यायी उत्पन्न’’ (Best Alternative Income) तसेच ‘‘सर्वोत्कृष्ट ए.टी.एम्. पुढाकार’’(Best ATM Initiative) हे दोन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. बँकींग फ्रंटिअर्सच्या माध्यमातून ‘फ्रंटिअर्स इन को-ऑपरेटिव्ह बँकींग ऍवाडर्स’ हे पुरस्कार बँकींगमधील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱया बँकांना दिले जातात. यावर्षीचे ‘बँकींग फ्रंटिअर्स’द्वारे देण्यात येणाऱया पुरस्कारांचा दिमाखदार पुरस्कार प्रदान सोहळा नुकताच गोवा येथे पार पडला. त्यावेळी दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबईचे कार्याध्यक्ष तथा उप आयुक्त (करनिर्धारण व संकलन) श्री. मिलीन सावंत यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
त्याचप्रमाणे अविज पब्लिकेशन (कोल्हापूर) व गॅलेक्सी इन्मा (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ऍडव्हॅन्टेज २०१५’ पुरस्कार वितरणदेखील गोवा येथे नुकतेच पार पडले. यावेळी ‘पगारदार सहकारी बँका’ या विभागातून दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबई ला प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. बँकेचे तज्ज्ञ संचालक तथा प्रमुख लेखापाल (वित्त) श्री. हरिभाऊ निकम आणि श्रीम. हेमलता येखे यांनी बँकेच्यावतीने हा पुरस्कार स्वीकारला.
दि बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लिमिटेड, मुंबई यांचेकडून‘पगारदार नोकरांची बँक म्हणून २०१३-१४ चे प्रथम पारितोषिक’ ‘दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबई’ ला प्रदान करण्यात आला आहे. मुंबईत पार पडलेल्या एका सोहळ्यात बँकेचे संचालक श्री. विजयकुमार कासकर, श्री. सहदेव मोहिते आणि श्री. बिपीन बोरीचा यांनी बँकेच्यावतीने पुरस्कार स्वीकारला.
म्युनिसिपल बँकेला सलग ५ वर्षांत विविध प्रकारच्या पुरस्काराने गौरविण्यात येत आहे. दि म्युनिसिपल को-ऑप.बँक लि., मुंबई ही एखाद्या खासगी बँकेसारखीच अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित बँकींग सेवा ग्राहकांना उपलब्ध करुन देत आहे.बँकेने सन – २०१५ मध्ये ढोबळ एन.पी.ए. २.१६ टक्क्यांवरुन १.८४ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे, तर निव्वळ एन.पी.ए. ‘०’ टक्के आहे. उत्कृष्ट नियोजन, कर्ज वसुलीसाठी केलेला सततचा पाठपुरावा यामुळे ढोबळ एन.पी.ए. चे प्रमाण कमी झाले असून गत ५ वर्षांत बँकेने चौफेर प्रगती केली आहे. सन २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी बँकेस एकूण ४ पुरस्कार मिळालेले आहेत.
No comments:
Post a Comment