मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या बेस्टची परिस्थिती हालाकीची आहे. बेस्टची परिस्थिती चांगली करावी म्हणून राजकीय पुढारी आणि सत्ताधारी नेहमीच राज्य आणि केंद्र सरकारकडे हात पसरत असतात. राज्य आणि केंद्र सरकार म्हणावी तशी काहीही मदत करत नसल्याने बेस्टच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. आपल्या देशाचे प्रधानमंत्री अच्छे दिन आने वाले है अशी स्वप्ने दाखवत आहेत. देशातील जनतेची स्वप्ने पूर्ण होतील कि नाही हे माहित नाही. परंतू बेस्ट ला मात्र येणाऱ्या काळात नक्कीच अच्छे दिन येणार आहेत.
बेस्टला येणारे अच्छे दिन प्रधानमंत्री आणणार नसून मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त अजोय मेहता आणणार आहे.पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी नुकतीच बेस्ट मुख्यालयाला भेट दिली. पालिकेच्या आयुक्तांनी बेस्ट मुख्यालयाला भेट देण्याचा हा पहिलाच प्रसंग असावा. या भेटी दरम्यान बेस्टचे महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी बेस्ट उपक्रमाबाबत एक प्रेझेन्टेशन पालिका आयुक्तांना दाखवले आहे. या वेळी बेस्टच्या सर्वच बाबींवर विचार करण्यात आला आहे. बेस्टला फायद्यात आणण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी उपलब्ध झाली आहे.
बेस्टवर असलेल्या कर्जामुळे बेस्टच्या कर्मचारी अधिकारी यांचा पगार करणे मुश्किल होत असते. पगार देण्यासाठी सतत छोटे कर्ज किंवा बँकेकडून रक्कम उचलावी लागत आहे. पालिकेने बेस्टला १६०० कोटी कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. त्या कर्जाच्या व्याजाचा हप्ता 40 कोटी रुपये दरमहा पालिकेला दिला जातो. या हप्त्यापैकी 30 कोटी रुपये मुद्दल आणि 10 कोटी रुपये व्याज दिले जाते. दरमहा हे कर्ज १० टक्के व्याजाने वसूल केले जात आहे. कर्ज परत करण्यास उशीर झाल्यास १५ टक्के दराने कर्ज परत घेतले जाते.
बेस्टवर टोल टॅक्सचा 12 कोटी, प्रवाशी कराचा 40 कोटी, पोषण अधिभाराचा 16 कोटी आणि विद्युत अधिभाराचा 642 कोटी रुपयांचा बोजा आहे. केंद्र सरकारने बेस्टला 1400 कोटी रुपये दिले. पालिकेनेबेस्टला बस खरेदीसाठी 300 कोटी रुपये दिले आहेत. राज्य सरकारसह पालिका बेस्टकडून 37 कोटी वसूल करते. बेस्टला पालिकेने यंदा 100 कोटी दिले आहेत, तर पुढच्या वर्षीही तितकाच निधी देणार आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी दिली आहे. अशी माहिती देताना राज्य सरकारला पत्र पाहवून फणसे यांनी बेस्टला सवलत मिळावी अशी मागणी केली आहे.
बेस्टला सवलत मिळावी म्हणून बेस्ट प्रशासन कित्तेक वर्षे प्रयत्न करत आहे. परंतू अशी सवलत कशीही बेस्टला देण्यात आलेली नाही. यामुळे बेस्ट सातत्याने घाट्यात जात आहे. मुक्तच बोनस देण्यासाठीही पालिकेच्या कर्जाचा हफ्ता बाजूला ठेवून कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात आला आहे. याचेही परिणाम बेस्टच्या आर्थिक परिस्थितीवर होणार आहेत. अश्या वेळी राजकारणी बेस्टला न्याय देण्यास आणि तोट्यातून बाहेर काढण्यास अपयशी ठरत असताना बेस्टला पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी आशेचा किरण दाखवला आहे.
बेस्ट भवन येथे झालेल्या बैठकीत तब्बल दीड ते दोन तास पालिका आयुक्त मेहता यांनी बेस्टचे सर्व प्रश्न समजून घेतले आहेत. बेस्ट मध्ये कोणते बदल करावयाचे आहेत यावर देखील चाचा करण्यात आली आहे. पालिकेकडे बेस्टची कोणते प्रस्ताव प्रलंबित आहेत ते प्रस्ताव लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन आयुक्तांनी बेस्ट व्यवस्थापकांना दिले आहे. राज्य सरकारकडे बेस्टने पाठवलेले अनेक प्रस्ताव अडकले आहेत. त्यावर अद्याप सकारात्मक विचार झालेला नाही.
अश्या प्रलंबित प्रस्तावाची माहिती बेस्ट प्रशासनाने पालिकेकडे पाठवावेत. अश्या प्रस्तावाला पालिकेकडून राज्य सरकारकडे पाठवून ते मंजूर करून घेण्यासाठी आयुक्त स्वतः पाठपुरावा करून प्रलंबित प्रस्ताव मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. पालिका आयुक्त स्वतः जातीने लक्ष घालणार असल्याने बेस्टचे प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर होतील अशी आशा आता बेस्ट प्रशासनाला वाटू लागली आहे. त्याला कारणही तसेच आहे.
पालिका आयुक्तांना स्वतः मुख्यमंत्र्यांनी पालिकेत पाठवले आहे. मुख्यमंत्री आणि पालिका आयुक्त यांचे चांगले संबंध आहेत. मुख्यमंत्री आणि पालिका आयुक्त यांच्यामधील चानागल्या संबंधाचा उपयोग झाल्यास बेस्टचे वर्षानुवर्षे राज्य सरकारकडे धूळ खात पडलेले प्रस्ताव मंजूर होऊ शकणार आहेत. असे घडल्यास ज्या राजकारणी आणि सत्ताधार्यांना जे जमले नाही ते पालिका आयुक्तांनी करून दाखवल्यास बेस्टला नक्कीच अच्छे दिन येणार असल्याची चर्चा बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये आहे.
बेस्टला मातृ संस्था असलेली मुंबई महानगरपालिका सापत्न वागणूक देत होती. पालिका आयुक्तांनी आअप्ले कर्तव्य समजून बेस्टच्या मुख्यालयात जाऊन बेस्टच्या व्यथा जाणून घेतल्या आहेत. बेस्ट आणि पालिका यामधील समन्वय साधता यावा म्हणून आणि कामे जलद गतीने करता यावीत म्हणून एका विशेष अधिकाऱ्याचीही नेमणूक केली आहे. बेस्टच्या इतिहासातील असा पहिलाच प्रसंग असल्याने बेस्टला नक्कीच चांगले दिवस येतील असे आयुक्तांच्या एकूण कार्यपद्धतीवरून दिसत आहे.
अजेयकुमार जाधव
मो. ९९६९१९१३६३
No comments:
Post a Comment