मुंबई / दिनांक - येणारी दिवाळी मुंबईकरांना घरी येणाऱया पाहुण्यांसह अधिक आनंदाने साजरी करता यावी व दिवाळीच्या काळात भासणारी पाण्याची गरज भागविली जावी, ही बाब लक्षात घेऊन मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी ‘दीपावली’ दरम्यान दिनांक १०, १२ व १३ नोव्हेंबर, २०१५ रोजी पाणीकपातीचा निर्णय मागे घेण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले आहेत. बुधवारी संपन्न झालेल्या गटनेत्यांच्या सभे दरम्यान हा निर्णय एकमताने घेण्यात आला असून त्यानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश महापौरांनी दिले आहेत.
मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी महापौर दालनात सर्व गटनेत्यांची बैठक आज आयोजित केली होती. उप महापौर अलका केरकर, सभागृह नेता तृष्णा विश्वासराव, स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे, महापालिका आयुक्त अजोय मेहता, सुधार समितीचे अध्यक्ष प्रकाश गंगाधरे, ‘बेस्ट’ समितीचे अध्यक्ष अरविंद दुधवडकर, भा.ज.प.चे गटनेते मनोज कोटक, समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते धनंजय पिसाळ, शिक्षण समितीच्या अध्यक्षा रितू तावडे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) एस. व्ही. आर. श्रीनिवास, अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) डॉ. संजय मुखर्जी, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) संजय देशमुख, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. पल्लवी दराडे हे या बैठकीला उपस्थित होते.
महापौर स्नेहल आंबेकर यांनी सभागृह नेता तृष्णा विश्वासराव व विरोधी पक्ष नेते देवेंद्र आंबेरकर यांनी दीपावली कालावधीत काही दिवसांसाठी पाणीकपात मागे घेण्याबाबतचे पत्र सादर केले असल्याचे सांगितले. दिवाळी या सणाचे जनमानसातील महत्त्व लक्षात घेता सदर तीन दिवसांदरम्यान पाणीकपात मागे घेण्याची सूचना मांडली. या सुचनेला सर्व गटनेत्यांनी एकमताने सहमती दर्शविली. त्यानुसार दिवाळी दरम्यान १० , १२ आणि १३ नोव्हेंबर रोजी या तीनही दिवशी सध्या महापालिका क्षेत्रात लागू असलेली पाणीकपात रद्द करण्याचे निर्देश महापौर स्नेहल आंबेकर यांनी प्रशासनाला दिले आहेत.
No comments:
Post a Comment