आयात डाळींच्या साठ्यावरील निर्बंध उठविले - गिरीश बापट - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 November 2015

आयात डाळींच्या साठ्यावरील निर्बंध उठविले - गिरीश बापट

मुंबई : राज्यातील डाळीचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासन अनेक उपाय योजना करीत असून परदेशातून आयात केलेल्या डाळींवरील साठा निर्बंध उठविण्याचाही निर्णय आज घेण्यात आला आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिली आहे. या निर्णयामुळे मुंबईतील बंदरांमध्ये अडकून पडलेला डाळीचा साठा खुल्या बाजारात विक्रीस येण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून तूर डाळीचे भाव वाढले होते. सर्वसामान्य नागरिकांना भाववाढीपासून दिलासा मिळावा, यासाठी राज्य शासनाने केंद्राच्या सूचनेनुसार डाळ, खाद्यतेले व खाद्यतेल बिया यांच्या साठवणुकीवर 19 ऑक्टोबर 2015 पासून निर्बंध लागू केले होते. यामध्ये परदेशातून आयात केलेल्या डाळींचाही समावेश होता. त्यामुळे मुंबईच्या बंदरात डाळीचा साठा अडकून पडला होता. याबाबत केंद्र सरकारकडून राज्य शासनास सूचना मिळाल्या होत्या. त्यानुसार अन्न व नागरी पुरवठा मंत्री बापट यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून आयात डाळींवरील साठा मर्यादेचे निर्बंध उठविण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचा आदेश आज काढण्यात आला आहे. या निर्णयामुळे मुंबई पोर्ट ट्रस्ट व जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट येथे परदेशातून आलेली सुमारे साडेपाच लाख टन डाळ व कडधान्ये खुल्या बाजारात विक्रीस उपलब्ध होणार आहे. या निर्णयामुळे डाळींचे भाव उतरण्यास मदत होणार असल्याचेही श्री. बापट यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad