मुंबई / प्रतिनिधी
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एम / पूर्व विभाग कार्यालयात दर वर्षी दिवाळी उत्सवा दरम्यान कार्यालयीन कामकाज कुठेही प्रभावित होणार नाही, याची पूर्ण काळजी घेऊन व वर्गणी गोळा करुन विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र यावर्षी राज्यातील दुष्काळ सदृश परिस्थिती लक्षात घेऊन विभाग कार्यालयातील सुमारे १३५० इतक्या संख्येने असणारे कामगार, कर्मचारी व अधिकारी यांनी या वर्षी दिवाळीचा कार्यक्रम न करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे दिवाळीच्या कार्यक्रमासाठी वर्गणी काढून जमा केलेली सुमारे ४.२५ लाखांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणगी स्वरुपात देण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमासाठी एम / पूर्व विभागातील गोवंडी परिसरात नुकत्याच संपन्न झालेल्या एका कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी एम / पूर्व विभागातील कामगार व कर्मचा-यांच्या वतीने सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी देणगीचा धनादेश मुख्यमंत्री महोदयांना सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी एम / पूर्व विभागातील कामगार व कर्मचा-यांच्या सामाजिक जाणीवेचा विशेष उल्लेख करीत अभिनंदन केले.महापालिकेच्या एम / पूर्व विभागामध्ये देवनार,अणुशक्ती नगर, गोवंडी, शिवाजी नगर आणि मानखुर्द यासारख्या परिसरांचा समावेश होतो. या विभागात विविध नागरी सेवा-सुविधा पुरविण्यासाठी सुमारे १,३५० इतके कामगार व कर्मचारी कार्यरत आहेत.
No comments:
Post a Comment