प्रदूषण विरहित दिवाळीचा उत्सव साजरा करा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 November 2015

प्रदूषण विरहित दिवाळीचा उत्सव साजरा करा


मुंबई - दिवाळीतील आतषबाजीमुळे ध्वनी आणि वायुप्रदूषण होऊ नये, म्हणून विविध सेवाभावी संस्थांनी दीपोत्सव प्रदूषण विरहित साजरा करण्याचे आवाहन मुंबईकरांना केले आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, आवाज फाउंडेशन आणि मुंबई पोलीस हे दिवाळीत ध्वनी आणि वायुप्रदूषण कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून याबाबत पुरेपूर जनजागृती करण्यात येत आहे. त्याचाच परिणाम म्हणून प्रदूषणाचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे. २०१४ साली गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत दिवाळीदरम्यान फटाक्यांचा आवाज तब्बल ४० डेसिबलने खाली आला होता. आवाज फाउंडेशनच्या नोंदीनुसार, फटाक्यांचा आवाज १२५ हून ८५ डेसिबल एवढा खाली आला. म्हणजे गतवर्षी मुंबईकरांनी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी केली. त्यामुळे यंदाही समाजभान राखत मुंबईकरांनी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी, असे आवाहन ‘आवाज फाउंडेशन’ने केले आहे.
पक्षी आणि प्राणिमित्रांसाठी काम करणाऱ्या भांडुप येथील ‘पॉज’ संघटनेनेही आतषबाजीने पक्षी आणि प्राण्यांना दुखापत होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दिवाळीतील वायुप्रदूषणाने विशेषत: पक्ष्यांना त्रास होतो. परिणामी वायुप्रदूषण करतील, असे फटाके वाजवू नयेत, असेही संस्थेने म्हटले आहे. शिवाय फटाक्यांमुळे भटकी कुत्री अथवा मांजरांनाही दुखापत होण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे दिवाळीच्या रंगामुळे पक्षी आणि प्राण्यांचा बेरंग होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन संस्थेने केले आहे.
पर्यावरणासाठी काम करणाऱ्या काळाचौकी येथील ‘ह्युमॅनिटी फाउंडेशन’नेही दिवाळीत मुंबईकरांनी ध्वनी आणि वायुप्रदूषण करू नये, असे आवाहन केले आहे. विशेषत: मरिन ड्राइव्हवर आतषबाजीवेळी मोठ्या प्रमाणावर वायुप्रदूषण होते. त्यामुळे येथे आतषबाजी करणाऱ्यांनी पर्यावरणाचे भान ठेवावे, असे संस्थेने म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad