दहशतवादविरोधी धोरणाचा सर्वोत्तम आराखडा सादर करा- मुख्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 November 2015

दहशतवादविरोधी धोरणाचा सर्वोत्तम आराखडा सादर करा- मुख्यमंत्री

मुंबई : आंतरराष्ट्रीय समस्या असलेल्या दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी पोलीस दलाने समाजातील सर्व घटकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करावा. तसेच तरुणांना दहशतवादापासून परावृत्त करण्यासाठी दहशतवादविरोधी धोरणाचा सर्वोत्तम आराखडा सादर करावा. त्यावर शासन योग्य ती कार्यवाही करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
पोलीस मुख्यालयात महाराष्ट्र पोलीस आणि सिंगापूरच्या इंटरनॅशनल सेंटर फॉर पॉलिटिकल व्हायोलन्स ॲन्ड टेररिझम रिसर्च (आयसीपीव्हीटीआर) या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने डी-रॅडिकलायझेशन ॲन्ड कम्युनिटी एंगेजमेंट या विषयावर आयोजित तीन दिवशीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजीत पाटील, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, अपर मुख्य सचिव (गृह) के. पी. बक्षी, पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, पोलीस आयुक्त अहमद जावेद आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी ‘सबका साथ, सबका विकास’ हा विचार महत्त्वाचा असून त्यासाठी सर्व समाजामध्ये शांतता आणि सलोख्याचे वातावरण असणे आवश्यक आहे. समाजात शांतता नांदण्यासाठी दहशतवादाचा बिमोड होणे आवश्यक आहे. राज्यातील दहशतवाद संपविण्यासाठी पोलीस दलातील प्रत्येकाला प्रशिक्षण देण्याबरोबरच दहशतवादविरोधी धोरणाचा सर्वोत्तम आराखडा तयार करणे आवश्यक आहे. हा आराखडा शासनास प्राप्त झाल्यानंतर शासन सर्व समाजाच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन याबाबत उचित कार्यवाही करेल.

डॉ. पाटील म्हणाले, जगातील 25 स्ट्राँग सिटी नेटवर्कमध्ये मुंबईचा समावेश झाला आहे. मुंबईला सुरक्षित ठेवण्यासाठी ‘फोर्स वन’ची स्थापना करण्याबरोबरच समाजात आत्मविश्वास वाढण्यासाठी मोहल्ला समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. यातून समाजात एकतेचे वातावरण तयार होण्यास मदत होत आहे.

कोणीही व्यक्ती जन्मत: दहशतवादी नसते, तिच्यामध्ये अन्यायाची भावना निर्माण झाल्यानंतर ती चुकीच्या मार्गाकडे वळते. त्यापासून तिला परावृत्त करणे महत्त्वाचे असल्याचे मत क्षत्रिय यांनी व्यक्त केले. या कार्यशाळेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या सुचनांची अंमलबजावणी करण्यासाठी गृह विभाग सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे बक्षी यांनी सांगितले. या कार्यशाळेत सहभागी पोलीस अधिकाऱ्यांना 2 ते 4 नोव्हेंबर या कालावधीत विविध विषयांवरील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad