मुंबई / प्रतिनिधी - एसटी महामंडळाने दिवाळी सणानिमित्त केलेली दहा ते वीस टक्के हंगामी भाडेवाढ अत्यंत अन्यायकारक व दुर्दैवी आहे, ही भाडेवाढ मागे घ्यावी व प्रवाशांना दिलासा द्यावा, अन्यथा मुंबईत एकही एसटी आगाराबाहेर पडू देणार नाही, असा इशारा राज्याचे माजी परिवहन राज्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी परिवहन मंत्री तथा एसटीचे अध्यक्ष दिवाकर रावते यांना दिला.
शिवसेना पक्षप्रमुख एकीकडे महागाई कमी करण्याची मागणी करतात व त्यांच्याच पक्षाचे नेते असलेले रावते खास दिवाळीसाठी म्हणून प्रवाशांवर वाढीव तिकीटाचा बोजा टाकतात हे अनाकलनीय आहे, अशी टीका त्यांनी केली. खासगी वाहतूकदारांचे भले करणारा हा निर्णय आहे. एसटीचे प्रवासी खासगी वाहतूकदारांकडे वळवण्याचा हा डाव असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे अहिर म्हणाले. एसटीचा हा उफराटा निर्णय आहे. हा निर्णय कोणत्या समितीने घेतला याची माहिती सरकारने द्यावी. केवळ एका मंत्र्यांच्या मनमानीपणामुळे असा निर्णय घेतला जावू नये, अशी अपेक्षा अहिर यांनी व्यक्त केली.
सरकारमध्ये निर्णय घेताना कोणताही ताळमेळ नसल्याची टीका त्यांनी केली. अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी काल जाहीर केल्याप्रमाणे शंभर रुपये किलो दराने बाजारात तूरडाळ उपलब्ध नाही. बापट यांनी राजकीय लाभासाठी खोटा निर्णय जाहीर केला आहे. आज दिवसभरात आमचे कार्यकर्ते व नागरिक शंभर रुपये किलो दराच्या तूरडाळीचा शोध घेत होते. मात्र त्यांना कुठेही या दराने तूरडाळ मिळालेली नाही. गिरीश बापट यांनी शंभर रुपये दराने कोणत्या ठिकाणी तूरडाळ मिळते त्याचा पत्ता जाहीर करावा, अन्यथा उद्या आमचे कार्यकर्ते शंभर रुपये घेऊन मंत्र्यांकडे तूरडाळीसाठी रांगा लावतील, असा इशारा सचिन अहिर यांनी दिला.
No comments:
Post a Comment