उद्यानांचा विकासदेखील नागरिकांच्या जीवनमानासाठी महत्त्वाचाः पर्यावरण मंत्री रामदास कदम - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 November 2015

उद्यानांचा विकासदेखील नागरिकांच्या जीवनमानासाठी महत्त्वाचाः पर्यावरण मंत्री रामदास कदम


मुंबई / प्रतिनिधी - जनतेला विविध नागरी सेवा-सुविधा पुरविताना उद्यानांची निर्मिती आणि विकास करणे, हे देखील महत्त्वाचे काम असून त्यामुळे नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावतो. मुंबईत एका पाठोपाठ महापालिकेच्या वतीने विकसित होत असलेली उद्याने पाहता मुंबईकरांचे जीवनमान उंचावत असल्याची खात्री पटते, असे उद्गार महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी काढले.


दहिसर (पूर्व) येथील ‘जरीमरी उद्यान’ आणि दहिसर (पश्चिम) येथील ‘साने गुरुजी उद्यान’ चा लोकार्पण सोहळा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या हस्ते आणि मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली काल (दिनांक ०८ नोव्हेंबर, २०१५) सायंकाळी अनुक्रमे जरीमरी उद्यान, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, दहिसर (पूर्व), मुंबई – ४०० ०६८ आणि साने गुरुजी उद्यान, सखाराम तरे महापालिका शाळेजवळ, रंगनाथ केसकर मार्ग, दहिसर (पश्चिम), मुंबई – ४०० ०६८ येथे पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.
     
यावेळी पर्यावरण मंत्री रामदास कदम पुढे म्हणाले की, शासन आणि प्रशासन ही दोन्ही चाके समान चालतात, तेव्हा विकास घडून येतो. बृहन्मुंबई महापालिकेचे पदाधिकारी आणि अधिकारी यांच्या प्रयत्नाने मुंबईत विकासकामे चांगल्यारितीने होत आहेत. दहिसरमध्ये स्थानिक नगरसेविका शीतल मुकेश म्हात्रे यांनीदेखील उद्याने, रस्ते यांची चांगली कामे केली असून त्यांना आवश्यकता भासल्यास मी स्वतः अशा विकास कामांसाठी निधी उपलब्ध करुन देईन, असे मंत्री महोदयांनी सांगताच जनतेने टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.
  
मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर या म्हणाल्या की, मुंबईकरांना मोकळा श्वास घेता यावा, याकरीता महापालिकेच्यावतीने ६० पेक्षा अधिक मोठी उद्याने एकाचवेळी विकसित करण्यात येत असून टप्प्याटप्प्याने त्यांचे लोकार्पण होत आहे. यामध्ये जवळपास १५ संकल्पना आधारित उद्याने (थीम गार्डन) देखील समाविष्ट आहे. दहिसरमध्ये नगरसेविका शीतल मुकेश म्हात्रे यांनी त्यांच्या विभागातील पूर्व व पश्चिम अशा दोन्ही बाजूस उद्याने विकसित करुन जनतेला समान न्याय दिला आहे. लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांना महापालिकेचे प्रशासनही सहकार्य करते आहे, असे सांगून मुंबईच्या विकासात सुजाण नागरिकांचाही वाटा असल्याचे महापौरांनी नमूद केले.

‘साने गुरुजी उद्यान’ विषयीः- साने गुरुजी उद्यान हे सुमारे १५०० चौरस मीटर जागेत वसले आहे. या उद्यानामध्ये जॉगिंग ट्रॅक, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, ऍम्फीथिएटर, योगा केंद्र, लहान मुलांसाठी खेळणी, पदपथ, प्रसाधनगृहे या सर्व सोयी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. उद्यानाच्या कामाची सुरुवात ही मार्च २०१४ मध्ये होऊन ऑगस्ट २०१५ मध्ये ते पूर्णत्वास आले आहे. सुमारे ७१ लाख रुपये खर्च करुन या उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे.

‘जरीमरी उद्यान’ विषयीः- जरीमरी उद्यान हे सुमारे ३००० चौरस मीटर जागेत वसले आहे. या उद्यानामध्ये कारंजे, गुलाब वाटिका, आयुर्वेदीक वाटिका, जॉगिंग ट्रॅक, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, लहान मुलांसाठी खेळणी, प्रसाधनगृहे या सर्व सोयी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. उद्यानाच्या कामाची सुरुवात मार्च २०१४ मध्ये होऊन ऑगस्ट २०१५ मध्ये ते पूर्णत्वास आले. सुमारे १ कोटी १८ लाख रुपये खर्च करुन या उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad