"सत्तेत असूनही शिवसेनेची सरकारविरोधी आंदोलने म्हणजे सत्ताधाऱ्यांमधला संवाद संपल्याचे चिन्ह' - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 October 2015

"सत्तेत असूनही शिवसेनेची सरकारविरोधी आंदोलने म्हणजे सत्ताधाऱ्यांमधला संवाद संपल्याचे चिन्ह'


मुंबई: १९ ऑक्टोबर
सत्ताधारी असूनही कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देत शिवसेना दररोज करत असलेली आंदोलने म्हणजे सत्तेत एकत्र असलेल्या शिवसेना आणि भाजपचा परस्पर संवाद संपल्याचे चिन्ह असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केली आहे. तसेच शिवसेनेला आंदोलनाची एवढी खुमखुमी असेल, तर त्यांनी सत्तेतून अगोदर बाहेर पडावे आणि सरकारशी थेट दोन हात करावेत, असे थेट आव्हानच त्यांनी शिवसेनेला दिले आहे.

सध्या पाकिस्तानी नागरिकांवरील बहिष्काराच्या मुद्दयावरून शिवसेना आपल्याच सरकारच्या विरोधात करत असलेली आंदोलने म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या आकलनाबाहेरची आहेत. कारण एकिकडे सध्याचे सरकार पाकिस्तानी नागरिक आणि कलाकारांच्या कार्यक्रमांना संरक्षण देत असतानाच याच सरकारचा एक भाग असलेली शिवसेना मात्र कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देत त्यांच्या विरोधात आंदोलने करते आहे. हा प्रकार म्हणजे " आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी', असा असल्याचा टोला हाणत मा. श्री. सचिन अहिर म्हणाले की, जर शिवसेनेला पाकिस्तानी नागरिकांना आणि कलाकारांना विरोध करायचाच असेल, तर असली किरकोळ आंदोलने करण्यापेक्षा आपल्या मित्र पक्षाचे नेते असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच आपली भुमिका समजावून सांगावी. तसेच यापुढे कोणत्याही पाकिस्तानी नागरिक किंवा कलाकाराला भारतात आमंत्रित न करण्याबद्दलही भाजपला सांगावे, म्हणजे मग आंदोलनात आपली शक्ती वाया घालवण्याची वेळच शिवसेनेवर येणार नाही.मात्र शिवसेना आपली भुमिका आपल्या मित्र पक्षालाच समजावू शकत नसेल तर ते सत्ताधाऱ्यांमधील विसंवादाचे चिन्ह असल्याचेही मा. अहिर म्हणाले. तसेच ते लोकशाही आणि सर्वसामान्यांसाठीही घातक असल्याचेही ते म्हणाले.


महागाईच्या मुद्द्यावरून लक्ष उडवण्यासाठी पाकिस्तानी विरोध-सध्या देशात कधी नव्हे इतका महागाईचा भडका उडाला आहे. ऐन सणासुदीच्या पार्श्वभुमीवर डाळीं, कांदे यासारख्या जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यावरून लक्ष उडवण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी हा पाकिस्तान विरोधाचा मुद्दा मोठ्या खुबीने पुढे केल्याचा आरोपही यावेळी मा. अहिर यांनी केला. तसेच विरोधात असताना महागाईच्या मुद्द्यावरून नेहमी रस्त्यावर उतरणारी शिवसेना आता महागाईने उच्चांक गाठला असतानाही गप्प का? असा सवालही त्यांनी केला.

Post Bottom Ad