मुंबई / विशेष प्रतिनिधी
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पिपल्स एज्युकेशन सोसायटीवर कोणत्या राजकीय पुढाऱ्याचे वर्चस्व असावे, कोण अध्यक्ष असावा यावरून गेले कित्तेक वर्षे वाद रंगला आहे. अध्यक्षपदाप्रमाणेच महाविद्या लयाचे प्राचार्यपद कोणाकडे असावे असाही वाद सुरु आहे. हा वाद आता वाढत गेला असून बौद्ध समाजाला २२ प्रतिज्ञा देणाऱ्या बाबासाहेबांच्या सिद्धार्थ महाविद्यालयात आता जादूटोणा आणि करणीचे प्रकार होऊ लागले आहेत. बाबासाहेबांच्या महाविद्यालयात अंधश्रद्धेचे प्रकार होऊ लागल्यामुळे महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी वैतागून गेले आहेत.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गरीब व उपेक्षित समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे, यासाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. मात्र गेल्या आठ-दहा वर्षांपासून पीपल्सवर ताबा मिळविण्यासाठी रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर या आंबेडकरी नेत्यांमध्ये संघर्ष सुरू आहे. या संस्थेचे मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालय असून महाविद्यालयात प्राचार्यपदाच्या वादालाही वेगळे वळण लागले आहे.
दोन दिवसांपूर्वी प्राचार्य मस्के यांनी त्यांच्या दालनात प्रवेश केला असता आत कुणी तरी लिंबू, मिरच्या टाकल्याचे दिसले. हा प्रकार जादूटोणा वा करणीचा आहे अशी चर्चा महाविद्यालयात आहे. या संदर्भात प्राचार्य मस्के यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आपल्या दालनात लिंबू-मिरच्या आढळल्याचे सांगितले. परंतु इतर काहीही बोलण्यास नकार दिला आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या महाविद्यालयात असे प्रकार होऊ लागल्याने प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ज्या बाबासाहेबांनी समाज अंधश्रद्धेतून मुक्त व्हावा, समाजात बुद्धिवाद व विज्ञानवाद रुजावा, यासाठी सातत्याने प्रयत्न केले, विचार मांडले, चळवळी केल्या त्यांच्याच महाविद्यालयात जादूटोणा-करणी करणे असे प्रकार केले जात असल्याने , असले अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे प्रकार घडत असल्याबद्दल प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी खंत व्यक्त केली.
No comments:
Post a Comment