प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांचे प्रतिपादन
मुंबई / प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारला ३१ ऑक्टोबर रोजी एक वर्ष पूर्ण होत असून सरकारने वर्षभरात समाजाच्या सर्व क्षेत्रांना स्पर्श करणारे काम केले आहे. पक्षाने निवडणुकीत दिलेली बरीच आश्वासने राज्य सरकारने पूर्ण केली असून सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त पक्षातर्फे राज्यभर कार्यक्रम आयोजित करण्यात येतील, असे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांनी सोमवारी मुंबईत सांगितले.
भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी उपस्थित होते.
रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, गेल्या वर्षी १९ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला व भाजपा हा सर्वांत मोठा पक्ष ठरला. भाजपाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी ३१ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे १९ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत सरकारची कामे जनतेपर्यंत पोहचविण्यात येतील. ही वर्षपूर्ती साजरी करताना कोणताही उत्सव नव्हे तर लोकसंवाद करण्यात येईल. दि. २९ व ३० ऑक्टोबर रोजी पक्षाचे नेते राज्यात ठिकठिकाणी समाजातील मान्यवरांशी संवाद साधणार आहेत. दि. ३१ ऑक्टोबर रोजी प्रत्येक बूथच्या क्षेत्रात भाजपाचे ध्वजारोहण करण्यात येईल व सरकारच्या कामाची माहिती देणारी पत्रके वाटण्यात येतील. त्यांनी सांगितले की, भाजपाच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने पक्षाच्या जाहीरनाम्यातील अनेक आश्वासने पूर्ण केली आहेत. अजून चार वर्षे हातात आहेत. आम्ही सर्व आश्वासने पूर्ण करू.
ते म्हणाले की, भाजपाने २०१५ हे संघटनपर्व मानले व वर्षभरात संघटनात्मक पातळीवर प्रभावी काम केले. पक्षाचे राज्यात एक कोटी पाच लाख सदस्य झाले. भाजपा हा राज्यातील सर्वांत मोठा पक्ष ठरला. पक्ष सदस्यांशी संपर्क साधण्यासाठी महासंपर्क अभियान व एक लाख कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणासाठी महाप्रशिक्षण अभियान यशस्वीपणे राबवले. लवकरच भाजपाचा संघटनात्मक निवडणुकांचा चौथा टप्पा सुरू होईल. वर्षभरात भाजपाने ठिकठिकाणी निवडणुकात लक्षणीय यश मिळवले.
ते म्हणाले की, राज्य सरकारने वर्षभरात चांगले काम केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत प्रभावी काम केले. तसेच मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी प्रभावी काम केले. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने सात हजार कोटींची मदत दिली. जलयुक्त शिवार हा राज्य सरकारचा सर्वांत महत्त्वाचा कार्यक्रम आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात धान्य, दीड लाख शेततळी अशी अनेक पावले सरकारने उचलली. दलित, आदिवासी, विद्यार्थी, उद्योजक अशा सर्व घटकांसाठी सरकारने काम केले.