मुंबई : दक्षिण मुंबईतील सी वॉर्डमधील कपडा मार्केटमधील गुमास्ता कर्मचाऱ्यांनी व्यापाऱ्यांविरोधात बंडाचा पवित्रा घेतला आहे. सात वर्षांपासून कोणत्याही प्रकारची वेतनवाढ मिळाली नसल्याने मुंबई गुमास्ता युनियनने ऐन दिवाळीत म्हणजे २८ आॅक्टोबरपासून सात दिवसांसाठी कपडा मार्केट बंदची हाक दिली आहे. युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत बंदची घोषणा केली.
राव म्हणाले की, कापड बाजारातील गुमास्ता कामगारांच्या वेतनासंदर्भातील मागणी गेल्या सात वर्षांपासून प्रलंबित आहेत. याबाबत कपडा बाजारातील १३ संघटनांची मिळून तयार केलेल्या संयुक्त कृती समितीला वारंवार चर्चेची मागणी केली.मात्र कृती समिती कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. येथील सुमारे १० हजार दुकानांत २५ हजार गुमास्ता काम करतात. मात्र तुटपुंज्या वेतनावर व्यापारी कामगारांचे शोषण करत आहेत.अखेर या संतप्त कामगारांनी व्यापाऱ्यांविरोधात मंगळवारी २० आॅक्टोबरला एक दिवसाचा संप पुकारला. मात्र दसरा आणि मोहरमच्या मुहूर्तावर ग्राहकांची गैरसोय होऊ नये, म्हणून तूर्तास बंद पुकारत नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र येत्या आठ दिवसांत व्यापाऱ्यांनी कोणतीही चर्चा केली नाही, तर सलग सात दिवस कामगार काम बंद आंदोलन करतील, असा निर्वाणीचा इशारा शशांक राव यांनी दिला आहे.