कायद्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना एकलव्य हे संकेतस्थळ मार्गदर्शक - मुख्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 October 2015

कायद्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना एकलव्य हे संकेतस्थळ मार्गदर्शक - मुख्यमंत्री

मुंबई : माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये कौशल्य विकासास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असून जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या कायदा व न्याय क्षेत्रात काम करणाऱ्यांना, अभ्यासकांना एकलव्य हे संकेतस्थळ उपयुक्त व मार्गदर्शक ठरेल, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
न्यायमूर्ती आर. सी. चव्हाण (निवृत्त) यांनी विकसित केलेल्या www.ekalavya.co.in या संकेतस्थळाचे उद्घाटन आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लोकायुक्त न्यायमूर्ती एम. एल. तहलियानी, विधी व न्याय विभागाचे सचिव एन. एम. जमादार, सुरेंद्र तावडे हे उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आजच्या काळात प्रत्येक क्षेत्रात कौशल्य विकासाद्वारे कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे. हे लक्षात घेऊन राज्यातील तरुणांचे कौशल्य विकसित करण्यासाठी शासनाने कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग सुरु केला आहे. या विभागाच्या महाकौशल्य पोर्टलद्वारे राज्यातील तरुणांना कौशल्य विकासाची माहिती उपलब्ध होते. या वेब पोर्टलला एकलव्य संकेतस्थळाची लिंक जोडण्यात येईल.

फडणवीस पुढे म्हणाले की, कायद्याच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात नवीन तरुण वर्ग येत असून त्यांना एकलव्य संकेतस्थळाच्या माध्यमातून माहितीचे महाद्वार उपलब्ध झाले आहे. या संकेतस्थळामुळे कायदा व न्याय क्षेत्रातील कामकाज पारदर्शी होण्यास मदत होईल.

लोकायुक्त न्या. तहलियानी म्हणाले की, विधी व न्याय क्षेत्रात काम करणाऱ्या जिल्हा व राज्य पातळीवरील व्यक्तींसाठी हे संकेतस्थळ माहितीपूर्ण ठरेल. या कार्यक्रमास मान्यवर न्यायमूर्तींसह महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे पदाधिकारी तसेच कायदा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS