मध्य रेल्वेचे प्रवासी लटकले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 October 2015

मध्य रेल्वेचे प्रवासी लटकले


मुंबई : कामावरुन रात्री नऊनंतर घरी परतणाऱ्या मध्य रेल्वेवरील प्रवाश्यांचे चांगलेच हाल झाले. चिंचपोकळी रेल्वे स्थानकात एका लोकलचा बॅटरी बॉक्स रुळावर पडल्याने लोकल बंद पडली. त्यामुळे डाऊनला जाणाऱ्या धीम्या लोकल या जलद मार्गावर वळवण्यात आल्या.

सीएसटी - ठाणे लोकल चिंचपोकळी स्थानकाजवळ रात्री नऊच्या सुमारास येताच या लोकलचा एक बॅटरी बॉक्स रुळावर पडल्याने लोकल जागीच थांबली. त्यामुळे मागील लोकलही जागेवरच थांबल्या. सीएसटीपासून दादर स्थानकापर्यंत धीम्या मार्गावरील प्लॅटफॉर्मवर तर प्रचंड गर्दी उसळली. कामावरुन घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे यामुळे खूपच हाल झाले. हा बॉक्स खूपच जड असल्याने तो ट्रॅकवरुन हटविल्याशिवाय भायखळा ते परेल दरम्यान ठाणे, कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या लोकल सुरु करणे कठीण होते. त्यामुळे भायखळा ते परेल दरम्यान डाऊन धीम्या मार्गावरील लोकल या जलद मार्गावर वळवण्यात आल्या. चिंचपोकळी, करी रोड आणि परेल स्थानकात धीम्या लोकल उपलब्ध होत नसल्याने या स्थानकात लोकल पकडण्यासाठी आलेल्या प्रवाशांचे मात्र हाल झाले. रात्री साडेदहा वाजता रुळावर पडलेला बॅटरी बॉक्स हटविण्यात आला आणि लोकल पुन्हा धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या. त्यामुळे रेल्वे रात्री उशिरापर्यंत विस्कळीतच होती. बॅटरी बॉक्स पडलेली लोकल ही पुढे यार्डात नेण्यात आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS