खाजगी संस्थांनी लघु, मध्यम उद्योगात गुंतवणूक करावी- सुभाष देसाई - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 October 2015

खाजगी संस्थांनी लघु, मध्यम उद्योगात गुंतवणूक करावी- सुभाष देसाई

मुंबई : राज्यातील औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांनी लघु, मध्यम उद्योगामध्ये गुंतवणूक करून औद्योगिक सहभाग वाढवावा, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.
वांद्रे येथे महाराष्ट्र राज्य लघु-उद्योग विकास महामंडळ, (MSMEs), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC), सारस्वत बँक, एसआयबीडीआय बँक, नाबार्ड बँक, इंडियन एज्यूकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ग्रोथ इंजिन फॅार मेक इन इंडिया ॲण्ड महाराष्ट्र’ उद्योग परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी देसाई बोलत होते.

देसाई म्हणाले, राज्यात ‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर ‘मेक इन महाराष्ट्र’ अशी वाटचाल सुरू करण्यात आली आहे. उद्योजकांना राज्यात गुंतवणूक करण्यासाठी यापूर्वी 76 परवानग्या घ्याव्या लागत होत्या. त्या 37 वर आणल्या आहेत. पण त्या अजून कमी करून लवकरच 25 पर्यंत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे राज्यातील गुंतवणुकांची प्रक्रिया अधिक सुलभ होऊन गुंतवणुकीचा वेग वाढण्यास मोठी मदत होणार आहे.

राज्यात उद्योगाला पोषक वातावरण असून कुशल मनुष्यबळही उपलब्ध आहे. कौशल्य आधारित रोजगार उपलब्ध करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेऊन स्वतंत्र कौशल्य विकास विभाग तयार करून कौशल्य विकासाच्या दिशेने शासनाने महत्वाचे पाऊल उचलले आहे. राज्यात दरवर्षी एक हजार अभियांत्रिकी विद्यालयातून एक लाख पदवीधर आणि पदविकाधारक विद्यार्थी बाहेर पडत असतात. अशा विद्यार्थ्यांच्या सहकार्यांनी राज्यात बंद पडलेले छोटे उद्योग, त्यांच्याकडे असलेला अनुभव आणि उपलब्ध असलेली साधनसामग्री यांची सांगड घालून बंद पडलेले लघुउद्योग पुन्हा सुरू करण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे, असेही देसाई यांनी सांगितले.

जागतिक बँकेकडून ‘ईझ ऑफ डुईंग बिझनेस 2016’ चा वार्षिक अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालात जागतिक क्रमवारीत भारताने मानांकन सुधारून 12 स्थानांनी सुधारणा केली आहे. शासनाने नवीन माहिती तंत्रज्ञान धोरण जाहीर केले आहे. त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. अनेक माहिती तंत्रज्ञात क्षेत्रातील कंपन्यांनी राज्यात गुंतवणूक केली आहे. डिजीटल इलेक्ट्रॅानिक उत्पादन क्षेत्रात जगात अग्रेसर समजल्या जाणाऱ्या फॅाक्सकॉन कंपनीने महाराष्ट्रासोबत सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार ही कंपनी येत्या पाच वर्षांत सुमारे 35 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करणार असून त्यातून 50 हजार रोजगार निर्मिती होणार आहे. त्याचबरोबर मायक्रोसॉफ्ट कंपनीनेसुद्धा राज्यात डेटा सेंटर सुरू केले आहे. राज्याचा समतोल विकास साधण्यासाठी त्या-त्या क्षेत्रातील औद्योगिक वातावरण आणि गरज लक्षात घेऊन विकास करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच अमरावती येथे टेक्स्टाईल पार्क सुरू करण्यात आले असून इचलकरंजी, मालेगाव, भिवंडी, मुंबई येथेही टेक्स्टाईल पार्क सुरू करण्याचा प्रयत्न आहे, असेही  देसाई यांनी सांगितले.

यावेळी महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष दीपक नाईक, महासंचालक चंद्रशेखर प्रभू, संतोष शेट्टी, इंडियन एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष अरविंद वैद्य, दैनिक लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, युनियन बँकेचे मोहन टाकसाळे यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS