मुंबई ( प्रतिनिधी ) -, मुंबईकरांची लाईफ लाइन म्हणून ओळख असलेल्या बेस्ट कामगारांना पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय आज बेस्ट प्रशानाने घेतला त्यामुळे अखेर तीन वषाॅनंतर बेस्ट कामगारांना सानुग्रह अनुदान मिळणार आहे त्यामुळे कामगारांना दिलासा मिळाला आहे. बेस्ट संकटात असतानाही मातोश्रीच्या मध्यस्तीने आज या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. कल्याण डोंबिवली महानगर पालिका निवडणुकीच्या दृष्टीने बेस्टच्या सानुग्रह अनुदानाच्या निर्णयाला विशेष महत्व आले आहे. बेस्ट कामगार कृती समितीला विश्वासात न घेता प्रशासनाने हा निर्णय घेतल्यामुळे कृती समितीत सरळ फूट पडली असून बेस्टवर संपाचे संकट कायम आहे.
मुंबई कराना कमी दरात सेवा देणाऱ्या बेस्टची आर्थिक स्थिती गेल्या अनेक वर्षापासून बिकट आहे. अशा स्थितीत बेस्ट कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देता येणार नाही अशी स्पष्ट भुमिका बेस्ट प्रशासनाने घेतली होती. मात्र शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाबाबत मध्यस्ती केली. मातोश्रीवर आज झालेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. यावेळी बेस्ट समितीचे अध्यक्ष अरूण दुधवडकर, महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील, पालिकेचे आयुक्त अजोय मेहता, बेस्ट समितीचे शिवसेनेचे सदस्य उपस्थित होते. बेस्ट कामगारांना गेली चार वर्षे सानुग्रह अनुदान मिळालेले नाही. बेस्ट संकटात असताना अचानक कल्याण डोंबिवली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेवून शिवसेनेने भाजपवर कुरघोडी केली आहे.
बेस्ट कामगार कृती समितीला विश्वास न घेता प्रशासनाने एकतर्फी निर्णय घेतल्यामुळे कृती समितीच्या नेत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. जाहिर झालेले सानुग्रह अनुदान कामगारांना मान्य नसून येत्या 3 नोव्हेंबर रोजी करीरोड येथील महाराष्ट्र हायस्कूलच्या मैदाना होणाऱ्या कामगार मेळाव्यात हा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती कृती समितीचे निमंत्रक के. एस. अहिरे यांनी दिली. त्यामुळे शिवसेनेने सानुग्रह अनुदानाच्या आंदोलनातून माघार घेतली असल्याने कृती समितीत सरळ फुट पडली आहे. त्यामुळे संपाचे संकट कायम आहे.
या सानुग्रह अनुदानाचा फॉर्म्युला ही तयार करण्यात आला आहे बेस्टला पालिकेने 1600 कोटी रुपये दिले आहेत. त्या कर्जाच्या व्याजाचा हप्ता 40 कोटी रुपये दरमहा पालिकेला दिला जातो. या हप्त्यापैकी 30 कोटी रुपये मुद्दल आणि 10 कोटी रुपये व्याज दिले जाते. एक महिन्याचे मुद्दल पालिकेला न देता ते सानुग्रह अनुदान म्हणून बेस्ट कर्मचाऱ्यांना देण्याचे ठरले आहे. यापुढे दरमहा व्याजाचा हप्ता 42 कोटी रुपये देवून त्यातून सानुग्रह अनुदानाची 30 कोटी रक्कम वळती केली जाणार आहे अशा प्रकारे सानुग्रह अनुदानाचा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment