मुंबई / प्रतिनिधी - बदललेली जीवनशैली आणि आहारपद्धतीने स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण झपाटय़ाने वाढत आहे. महिलांचे वय वाढते तसे धोका अधिक वाढतो. वयाच्या बाराव्या वर्षाच्या आधी मासिक पाळी सुरू होणे, मूल नसणे, मद्यपान, अधिक चरबीयुक्त आहार, लठ्ठपणा अशा महिलांना स्तनाचा कर्करोग होण्याचा शक्यता अधिक असते. शहरात प्रत्येक २५ महिलांमागे एक व खेडय़ात ३० महिलांमागे एक स्तनाच्या कर्करोगाच्या विळख्यात सापडली आहे.
कामाचा अतिरिक्त ताण व कुटुंबिक जबाबदारी यात अडकून पडल्याने अनेक महिला दुखणे अंगावर काढतात. आरोग्याकडे सतत दुर्लक्ष करत असल्याने महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. वेळेवर निदान व उपचार न झाल्याने आजार अधिक बळावतो. इतकेच नव्हे तर संबंधित महिलेचा मृत्यू होण्याचीही दाट शक्यता असते. परंतु, या स्तनांच्या कर्करोगाचे लवकर निदान व उपचार केल्याने हा आजार बरा होऊ शकतो. त्यामुळे महिलांनी आजाराकडे दुर्लक्ष करू नये, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment